पुणे - Nilesh Ghaywal : शहरातील कुख्यात गुंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निलेश घायवळला पुणे न्यायालयाने फरार घोषित केले आहे. न्यायालयाने त्याला नियमानुसार हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र न्यायालयीन प्रक्रियेची सातत्याने टाळाटाळ करत गैरहजर राहत असल्याने न्यायालयाने हा निर्णय घेतला.

अखेर न्यायालयाचा कठोर निर्णय-

पोलिसांनी सादर केलेल्या माहितीप्रमाणे, निलेश घायवळविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद असून अनेक प्रकरणांमध्ये तो आरोपी आहे. न्यायालयाने ठरलेल्या तारखांना त्याची उपस्थिती अनिवार्य असल्याचे सांगितले होते. परंतु वारंवार अनुपस्थित राहिल्यामुळे आणि पत्ता बदलत राहिल्यामुळे पोलिसांना त्याचा माग काढणे कठीण झाले. त्यामुळे न्यायालयाने त्याला कायद्यानुसार ‘प्रोक्लेम्ड ऑफेंडर’ म्हणजेच फरार घोषित करण्यात आले आहे.

मालमत्ता जप्तीची शक्यता-

फरार घोषित केल्यानंतर कायद्यानुसार पुढील टप्प्यात आरोपीची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. यामध्ये घर,प्लॉट,वाहनं,बँक खाती,व्यावसायिक मालमत्ता अशा सर्व संपत्तीची यादी तयार केली जाणार आहे. पोलिसांनी संबंधित विभागांना याची माहिती दिली आहे. लवकरच जप्तीची औपचारिक प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शहर पोलिसांचा शोधमोहीमेला वेग-

    निलेश घायवळ सध्या कोठे लपला आहे याबाबत पोलिसांकडे अधिकची माहिती नसली तरी पुणे ग्रामीण, मुंबई, कर्नाटक सीमा भाग, गोवा या ठिकाणी त्याचा संभाव्य संबंध आहे, अशी माहिती समोर येत आहे . निलेश यांच्या सहकाऱ्यांवर तसेच आर्थिक व्यवहारांवरही लक्ष ठेवण्यात येत आहे.

    अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये नाव -

    घायवळवर यापूर्वी खंडणी, मारहाण, धमकी, हत्येच्या प्रयत्नाचा आरोप, गुन्हेगारी टोळी चालवणे असे अनेक प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने त्याला पकडण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे.

    न्यायालयाने जाहीर सूचना देण्याचे आदेश!

    कायद्यानुसार, आरोपी फरार घोषित झाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी नोटिसा चिकटवणे, वृत्तपत्रांमध्ये जाहीर सूचना देणे, स्थानिक पोलिस स्टेशनमार्फत अलर्ट जारी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.