लातूर. शहरात एक धक्कादायक फसवणूक प्रकरण समोर आले असून महापालिकेत लिपिक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत मोठ्या रॅकेटने युवकांना गंडविल्याचे उघड झाले आहे. महापालिकेच्या विद्युत विभागातील एका कंत्राटी कर्मचाऱ्याने स्वतःला महानगर पालिकाची व्यक्ती म्हणून दाखवत खोटे नियुक्तीपत्रे देऊन तरुणांना लाखोंचा गंडा घातल्याचा आरोप आहे.
महापालिका आयुक्त मानसी मीना यांच्या स्वाक्षरी आणि महापालिकेचा शिक्का असलेली बनावट नियुक्तीपत्रे देत 6 जणांकडून सुमारे 30 लाखांची फसवणूक केली गेली. मात्र पीडित तरुणांच्या मते ही संख्या 6 वर न थांबता 100 हून अधिक तरुणांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. नोकरीसाठी प्रत्येकी 5 लाख रुपये घेण्यात आले असल्याची माहिती पुढे आली आहे.
कसे उघड झाले रॅकेट?
खोटे नियुक्तीपत्रे घेऊन काही तरुण महापालिकेत भरती होण्यासाठी गेल्यानंतर अधिकाऱ्यांना प्रकरणाची शंका आली. दस्तऐवजांची तपासणी करता ते सर्व बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर महापालिकेच्या वतीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
पोलिसांकडून वेगाने तपास!
शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या रॅकेटमध्ये महापालिकेबाहेरील इतर व्यक्तींचा सहभागही असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पैसे घेतल्याचे पुरावे, व्यवहाराचे डिजिटल ट्रेल, व्हॉट्सअॅप चॅट, कॉल रेकॉर्डस तपासले जात आहेत.
100 तरुणांची फसवणूक?
पीडितांच्या म्हणण्यानुसार, या रॅकेटने अनेक महिन्यांपासून नियुक्तीपत्र,आयडी कार्ड, वेतन पत्रक यासारखी कागदपत्रे छापून बनावट भरती प्रक्रिया चालवली होती. प्रत्येकी 4–5 लाख रुपये आकारून ‘मनपात नोकरी’ लावल्याचे भासवले जात होते.
महापालिकेची भूमिका!
महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की,कोणतीही भरती प्रक्रिया अधिकृत जाहीरनाम्याद्वारेच केली जाते. सध्या कोणतीही क्लार्क / लिपिक भरती सुरू नाही. आयुक्त मानसी मीना यांनी त्वरित कारवाई करत संबंधित विभागाला अंतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत. बनावट कागदपत्रेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
