एजन्सी, नागपूर. Nagpur Violence Fahim Khan: नागपूर हिंसाचारातील मुख्य आरोपी फहीम खान आणि इतर पाच जणांवर सायबर पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच, येथील अशांततेदरम्यान सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे, असे डीसीपी सायबर क्राईम लोहित मतानी यांनी गुरुवारी सांगितले.
चार FIR नोंदवले
या सहा जणांचा त्या 50 आरोपींमध्ये समावेश आहे, ज्यांच्या विरोधात सायबर विभागाने सोमवारी झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात चार प्रथम माहिती अहवाल (FIR) नोंदवले आहेत, असे डीसीपी सायबर क्राईम लोहित मतानी यांनी सांगितले.
230 प्रोफाईल्सबद्दल माहिती मागितली
सायबर गुन्हे विभागाने फेसबुक, एक्स, इंस्टाग्राम आणि यूट्यूब प्रशासनांकडे त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील 230 प्रोफाईल्सबद्दल माहिती मागितली आहे आणि त्यांना ब्लॉक करण्याची मागणी केली आहे, असे डीसीपी सायबर क्राईम लोहित मतानी यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. माहिती मिळताच आरोपींची ओळख पटवून त्यांना पोलिस अटक करतील, असे ते म्हणाले.
हिंसाचार आणखी भडकला
अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांच्या तपासात असे दिसून आले आहे की, सोशल मीडियावर काही व्हिडिओ शेअर केल्यानंतर सुरुवातीला चुकीची माहिती पसरवली गेली, ज्यामुळे हिंसाचार आणखी भडकला आणि त्यानंतर आणखी व्हिडिओमध्ये "हिंसाचाराचे उदात्तीकरण" करण्यात आले.
देशद्रोहाचा गुन्हा
अल्पसंख्याक लोकशाही पक्षाचे (एमडीपी) शहर प्रमुख फहीम खान यांच्यासह सहा जणांवर सायबर पोलिसांच्या एफआयआरमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे मतानी यांनी सांगितले.
आयाती जाळल्याची अफवा ठरली कारण
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या मुघल सम्राट औरंगजेबाच्या कबरीला हटवण्याची मागणी करणाऱ्या विश्व हिंदू परिषदेच्या (व्हीएचपी) नेतृत्वाखालील आंदोलनादरम्यान आयाती जाळल्याची अफवा सोमवारी हिंसाचाराचे प्राथमिक कारण ठरली.
सोमवारी रात्री जमावाने तोडफोड करून वाहनांचे नुकसान केले, पोलिसांवर पेट्रोल बॉम्ब आणि दगडफेक केली आणि घरांवर हल्ला केला, तेव्हा तीन डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांसह 33 पोलीस कर्मचारी जखमी झाले.
मतानी म्हणाले की, खानने औरंगजेबाच्या कबरीच्या विरोधातील आंदोलनाचा व्हिडिओ इडिट केला आणि तो (सोशल मीडियावर) प्रसारित केला आणि त्याने "हिंसाचाराचे उदात्तीकरण" करणारे व्हिडिओ देखील शेअर केले.
औरंगजेबाच्या कबरीच्या विरोधात चिथावणीखोर व्हिडिओ तयार करणे आणि हिंसाचार भडकवण्यासाठी ते प्रसारित करणे या संदर्भात चार एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. याशिवाय, हिंसाचार आणखी भडवण्यासाठी (सोशल मीडियावर) हिंसाचाराचे क्लिपिंग्ज शेअर करण्यात आले.
तसेच, असभ्य पोस्ट शेअर करण्यात आल्या, ज्यामुळे हिंसाचार आणखी भडकला आणि दंगलीचे व्हिडिओ आणि (काही लोकांनी केलेले) घोषणांचे उदात्तीकरण करून अधिक हिंसाचार भडकावण्यात आला, असे मतानी यांनी एफआयआरचा संदर्भ देत सांगितले.