जेएनएन, नागपूर. Nagpur Violence News: नागपुरात औरंगजेबाच्या कबरीवरुन झालेल्या हिंसाचारातून एक धक्कादायक घटना घडली आहे. नागपूरात सोमवारी संध्याकाळी दगडफेक झाल्यानंतर तणावाचे वातावरण होते. त्याच पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रात्री अंधार होता. पोलिस बंदोबस्तात काही महिला कर्मचारीही होत्या. त्यातील एक महिला कर्मचाऱ्यांना हिंसाचार कर्त्यांनी विनयभंग केला आहे, अशी तक्रार गणेशपेठ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग
नागपूर शहरातील भालदारपुरा भागातील एका गल्लीतून पोलीस येत होते. त्यावेळी दंगा नियंत्रण पथकातील महिला पोलिस कर्मचाराही तेथे आल्या होत्या. त्यावेळी तेथे दगडफेक करणारे, जाळपोळ करणाऱ्यांना रोखण्याचा, त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू होता. त्या घटनास्थळी मोठ्या प्रमाणात अंधार होता, आणि त्याच अंधाराचा फायदा घेऊन जमावातील काहींनी त्या गल्लीत महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. अशी संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी जमावाविरोधात गणेशपेठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा घृणास्पद प्रकार करणारे आरोपी कोण याचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे.
हेही वाचा - Nagpur Violence: नागरिकांत भीती निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु, संजय राऊतांची देवेंद्र फडणवीसांवर टीका
आरोपींना 21 पर्यंत पोलीस कोठडी
नागपुरातील हिंसाचार प्रकरणातील आरोपींना 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मंगळवारी रात्री उशिरा या आरोपींना कोर्टाने 21 पर्यंत पोलीस कोठडी दिला आहे. रात्री अडीच वाजेपर्यंत जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणी सुनावणी पार पडली आहे.
46 आरोपींना पोलिसांनी अटक
आतापर्यंत एकूण 46 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी 36 आरोपींना काल पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं होतं. सर्व आरोपींविरोधात गणेशपेठ आणि तहसील पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.