एजन्सी, नागपूर. Nagpur Violence: नागपुरात झालेल्या हिंसाचारानंतर आता येथील परिस्थिती नियंत्रणात आहे, मात्र शहरातील संवेदनशील भागात संचारबंदी कायम आहे, असं पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी सांगितले. दुपारी परिस्थितीचा आढावा घेतला जाईल, असंही ते म्हणाले. 

2,000 हून अधिक सशस्त्र पोलीस कर्मचारी तैनात

दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, संवेदनशील भागात 2,000 हून अधिक सशस्त्र पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, क्यूआरटी (क्विक रिस्पॉन्स टीम) आणि आरसीपी (दंगल नियंत्रण पोलीस) डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली गस्त घालत आहेत.

आतापर्यंत 50 लोकांना ताब्यात घेतले

नागपूर हिंसाचारावर डीसीपी राहुल माकणीकर माहिती देताना सांगितलं की, "परिस्थिती नियंत्रणात आहे. तपास सुरू आहे. आम्ही 10 पथके तयार केली आहेत. आम्ही आतापर्यंत 50 लोकांना ताब्यात घेतले आहे…"

नागपूर हिंसाचार प्रकरण

    सोमवारी रात्री मध्य नागपुरातील महाल भागातील चिटणीस पार्कमध्ये हिंसाचार उसळला, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करणाऱ्या उजव्या विचारसरणीच्या संघटनेच्या आंदोलनादरम्यान एका समुदायाचा पवित्र ग्रंथ जाळल्याच्या अफवेमुळे पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या हिंसाचारात 34 पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. त्यानंतर शहरातील संवेदनशील भागात लोकांच्या आणि वाहनांच्या हालचालींवर निर्बंध घालणारी संचारबंदी लागू करण्यात आली.

    संबंधित भागाचे पोलीस उपायुक्त निर्णय घेतील

    शहर पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधा नगर आणि कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आता संचारबंदी लागू आहे. संचारबंदी दरम्यान, संबंधित भागाचे पोलीस उपायुक्त (डीसीपी) रस्त्यावरील वाहनांच्या हालचालींबाबत निर्णय घेतील, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

    3 डीसीपींसह 12 पोलीस जखमी

    एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सोमवारी रात्री झालेल्या हिंसाचारात 3 डीसीपींसह 12 पोलीस जखमी झाले. दगडफेक आणि जाळपोळीच्या प्रकरणात आतापर्यंत सुमारे 50 जणांना अटक करण्यात आली आहे.