एजन्सी, नवी दिल्ली: छत्रपती संभाजीनगरमधील मुघल सम्राट औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीवरून नागपुरात झालेल्या हिंसाचाराचा विहिंपने मंगळवारी निषेध केला. तसंच, यामध्ये सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. औरंगजेबाचा पराभव करणाऱ्या धनजी जाधव, संताजी घोरपडे आणि छत्रपती राजारामजी महाराज यांचे 'विजय स्मारक' तिथे बांधले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या घरावर हल्ले
या घटनेचा निषेध करताना विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) सरचिटणीस मिलिंद परांडे यांनी विशिष्ट समुदायाच्या एका गटाने हल्ले आणि जाळपोळ केल्याचा आरोप केला. विहिंपच्या युवा शाखा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या घरावर हल्ले झाले, त्यांनी अनेक घरांना लक्ष्य केले. विश्व हिंदू परिषद या सर्वांचा तीव्र निषेध करते, असे त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
‘ही अत्यंत लाजिरवाणी बाब’
"एकीकडे हिंदू समाजाने श्लोक जाळल्याचा खोटा प्रचार करण्यात आला, तर दुसरीकडे हिंसाचार भडकावण्याचा घृणास्पद प्रयत्न करण्यात आला, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. अशा सर्व समाजकंटकांवर कठोर कारवाई केली पाहिजे," असं त्यांनी म्हटलं आहे.
'विजय स्मारक' तिथे बांधले पाहिजे,
छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण थांबवले पाहिजे आणि त्यात सुधारणा करण्याचा विचारही करू नये, असे विहिंपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. "औरंगजेबाच्या कबरीऐवजी, औरंगजेबाचा पराभव करणाऱ्या धनजी जाधव, संताजी घोरपडे आणि छत्रपती राजारामजी महाराज यांचे 'विजय स्मारक' तिथे बांधले पाहिजे," असे ते म्हणाले.
'विजय स्तंभ' बांधण्याची मागणी
"मराठा साम्राज्याखाली औरंगजेबाच्या पराभवाच्या स्मरणार्थ 'विजय स्तंभ' बांधण्याची विश्व हिंदू परिषदेची मागणी आहे. त्यामुळे हिंसाचारात सहभागी असलेल्या लोकांवर तात्काळ कारवाई करावी आणि त्यांना कठोरपणे रोखले पाहिजे," असे परांडे यांनी पुढे म्हटले.
45 जणांना अटक
दरम्यान, सोमवारी उसळलेल्या हिंसाचाराप्रकरणी किमान 45 जणांना अटक करण्यात आली आहे, असे नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी सांगितले. या घटनेत 34 पोलीस कर्मचारी आणि इतर पाच जण जखमी झाले आहेत, असेही त्यांनी सांगितले.