जेएनएन, मुंबई. Uddhav Thackeray Group Meeting: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून आऊटगोईंग थांबायचे नाव घेत नाही. राजन साळवी यांच्यासह अनेकांनी कोकणातून साथ सोडली. आता याच पार्शभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाच्या खासदारांची बैठक 20 फेब्रुवारी रोजी तर आमदारांची बैठक 25 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे खासदार आणि आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. अनेक माजी आमदार आणि पक्षाचे पदाधिकारी ठाकरे सोडून जात असताना उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आदित्य ठाकरेंनी घेतली होती बैठक
दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत खासदारांची बैठक घेतली. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना काही खासदार ठाकरे सोडून जातील अशी चर्चा होती. मात्र, सध्यातरी ठाकरे गटांच्या खासदारांनी पक्षाला रामराम करण्याचा निर्णय घेतलेला नाही.
विरोधी पक्षाच्या नेत्याच्या नावावर चर्चा
खासदारांच्या बैठकीनंतर 25 फेब्रुवारी रोजी ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक होणार आहे. विधानसभेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदारांची बैठक बोलवली असल्याची चर्चा आहे. तसंच, आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, या बैठकीत विरोधी पक्षाच्या नेत्याच्या नावावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
शिवसेना भवनात होणार बैठक
खासदारांना 20 तारखेला आणि आमदारांना 25 तारखेला शिवसेना भवनात होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आल्याचीही सूत्रांची माहिती आहे.