जेएनएन, मुंबई. मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात नेत्यांचं इनकमिंक सुरु आहे. शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर अवलंबल्या जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणारे शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास दाखवत मुंबई, पुणे येथील उद्धव ठाकरे यांच्या व रायगड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या आगरी कोळी समाजाच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
हेही वाचा - Nagpur Violence: मास्टरमाईंड फहीम खानसह 6 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल, 230 प्रोफाईल्सबद्दल माहिती मागितली
बारामतीच्या जिल्हाप्रमुख कल्पना थोरवेचा पक्षप्रवेश
यात उबाठा गटाच्या माजी नगरसेविका आणि बारामतीच्या जिल्हाप्रमुख कल्पना थोरवे, विधी विभागाचे प्रमुख संभाजी थोरवे, पुणे उप-शहरप्रमुख नितीन पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आगरी कोळी समाजाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मनोहर ठाकूर, उरणचे अँडव्होकेट योगशे बापर्डेकर यांनी हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.
यावेळी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेनेचे माजी नगरसेवक पांडुरंग पाटील, प्रवक्ते राहुल लोंढे आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी आवर्जून उपस्थित होते.
दोन माजी आमदारांचा पक्षप्रवेश
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या दोन माजी आमदारांसह जिल्हाध्यक्षांनीसुद्धा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांचे कोकणातील खास नेते मानले जाणारे राजन साळवी यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. तसंच, नुकतेच मुंबईतील तीन नगरसेवकांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.