जेएनएन, मुंबई. Parinay Fuke On Cotton farmers: राज्यात सुमारे 40 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली असून यंदा 370 लाख क्विंटल उत्पादन होण्याचा अंदाज आहे. परंतु अजूनही सुमारे 60 ते 70 लाख क्विंटल अर्थात 18 टक्के कापूस शिल्लक आहे. मात्र भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) 15 मार्चपासून कापूस खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट निर्माण झाले आहे, असं विधानपरिषदेत भाजपा आमदार डॉ. परिणय फुके सांगितले.

शेतकऱ्यांना तत्काळ दिलासा देण्यासाठी

शासकीय खरेदी बंद पडल्याने खाजगी बाजारातील दर आणखी कमी होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना तत्काळ दिलासा देण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी आमदार डॉ. परिणय फुके यांनी आज विधानपरिषदेत केली.

विदर्भातील शेतकरी देशोधडीला

सीसीआयने 15 मार्च पासून कापूस खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांपुढे खाजगी बाजाराशिवाय पर्याय नाही. परंतु राज्यात कापसाचे दर आधीच हमीभावापेक्षा कमी असून त्यातच आता 'सीसीआय' च्या निर्णयामुळे विदर्भातील शेतकरी देशोधडीला लागण्याची शक्यता आमदार डॉ. परिणय फुके यांनी व्यक्त केली.

    हेही वाचा - Nagpur Violence: नागपूरच्या दंगलग्रस्त भागाची काँग्रेस करणार पाहणी, केली समिती गठीत 

    कापसाचा दर आणखी कमी होण्याची शक्यता

    सीसीआयने यंदा राज्यात 124 केंद्रांवर कापसाची हमीदराने खरेदी प्रक्रिया राबविली. 'सीसीआय'ने खरेदी बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना खाजगी बाजाराशिवाय पर्याय राहीला नाही. सद्यःस्थितीत या बाजारात कापसाला सहा ते सात हजार रुपयांचा दर असून शासकीय खरेदी बंद पडल्यास खाजगी बाजारातील दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कार्यवाही व उपाययोजना करण्यात याव्या, अशी मागणी आमदार डॉ. फुके यांनी केली.