जेएनएन, मुंबई: दिशा सालियन मृत्यू प्रकरण (Disha Salian Case) पुन्हा न्यायलयात दाखल झाल्याने उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांची अडचण वाढणार आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची नव्याने चौकशी करण्यात यावी अशी मागणी वडील सतीश सालियन यांनी केली आहे. 

सतीश यांनी या प्रकरणात एक नवीन याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा आरोप वडिलांनी केली आहे. या प्रकरणात एनआयए चौकशी करून लवकर सुनावणी करण्याची विनंती ही सतीश सालियान यांनी कोर्टाला केली आहे. दिशा सालियान प्रकरणात मुंबई पोलिस, आदित्य ठाकरे, सूरज पांचोली यांच्यासह अनेकांवर गंभीर आरोप वडील सतीश सालियान यांनी केले आहेत.

दिशा सालियान प्रकरणात अर्णब गोस्वामी, नितेश राणे यांच्या आरोपात तथ्य असल्याचे म्हटले आहे. दिशा सालियान मृत्यूचा तपास समीर वानखेडेंसारख्या अधिकाऱ्यांकडून करावा अशी मागणीची नवीन याचिका सतीश सालियान यांनी कोर्टात दाखल केली आहे. 

मुंबई पोलिस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करत आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप ही सतीश यांनी केला आहे. नजरकैदेत ठेवून मांडलेले पुरावे खरे मानण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोपही याचिकेत केला आहे. 

    दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोर्या यांच्यासह मुंबई पोलिसांवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणाची चौकशी एनआयएच्या माध्यमातून करावी, अशी विनंती ही सतीश सालियान यांनी केली आहे.