जेएनएन/एजन्सी, मुंबई. Maharashtra Budget Session 2025: विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यावर ही विधान परिषद पूर्ण विश्वास व्यक्त करीत आहे, अशा आशयाचा विश्वासदर्शक प्रस्ताव भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी आज विधान परिषदेत मांडला. हा प्रस्ताव सभागृहाने आवाजी मतदानाने मंजूर केला.
राम शिंदे यांनी स्वीकारला प्रस्ताव
भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी गोऱ्हे यांच्या संदर्भातील ठराव विधानपरिषदेत मांडला. सभापती राम शिंदे यांनी हा ठराव स्वीकारला आणि तो आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला.
आवाजी मतदानाने विश्वासदर्शक प्रस्ताव मंजूर
आमदार दरेकर यांनी “महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्यावर ही विधानपरिषद पूर्ण विश्वास व्यक्त करत आहे”, असा एका ओळीचा प्रस्ताव सभागृहात मांडला. विधान परिषदेचे सभापती यांनी हा प्रस्ताव मतास टाकला व सभागृहाने आवाजी मतदानाने तो मंजूर केल्यानंतर प्रस्ताव मंजूर झाल्याचे सभापती यांनी जाहीर केले.
अनिल परबांनी या ठरावाला दर्शवला विरोध
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अनिल परब यांनी या ठरावाला विरोध दर्शवला आणि सभापती शिंदे यांनी त्यांना या विषयावर बोलण्याचा अधिकार नाकारल्याचा आरोप केला. काही वेळ गोंधळानंतर सभापती राम शिंदे यांनी सभागृह 15 मिनिटांसाठी तहकूब केले.
हेही वाचा - Mumbai News: मत्स्यव्यवसाय विकासासाठी एकात्मिक विशेष आर्थिक क्षेत्र निर्माण, 25000 जणांना मिळणार रोजगार
अविश्वास ठराव फेटाळला
ठाकरे गटाच्या आमदारांनी गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत तत्कालीन कथीत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर विरोधकांनी त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला होता. मात्र, तो आवश्यक कायदेशीर आणि प्रक्रियात्मक चौकटीत बसत नसल्याचे निरीक्षण नोंदवत सभापती राम शिंदे यांनी मंगळवारी हा अविश्वास ठराव फेटाळला होता.