जेएनएन, मुंबई. Eknath Shinde: भारताचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज शपथ घेतली, हे महाराष्ट्रासाठी "भूषण" आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आपल्या वडिलांकडून सामाजिक कार्याचा वसा घेतलेले न्या. भूषण गवई सर्वोच्च न्यायालयातील अनेक घटनात्मक खंडपीठांचा भाग होते. ज्याद्वारे अनेक चांगले ऐतिहासिक निकाल त्यांनी दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून न्या. गवई यांनी "महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ" नागपुरात स्थापन व्हावे, यासाठी महत्त्वाचे योगदान दिले होते. विविध न्यायालयांमधील पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठीही त्यांचे विशेष योगदान आहे.
न्यायालयीन सेवेत आपल्या दीर्घ आणि निष्कलंक कार्यकाळात त्यांनी विविध उच्च पदांवर काम करताना न्याय, नीतिमत्ता आणि पारदर्शकतेचे भान राखले आहे. त्यांच्या कारकीर्दीत भारतीय न्यायव्यवस्था अधिक सुदृढ, विश्वासार्ह आणि लोकाभिमुख होईल, असा मला विश्वास आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत
हेही वाचा - देशाचे 52 वे सरन्यायाधीश बनले बी.आर. गवई, राष्ट्रपतींनी दिली शपथ; बुलडोझर कारवाईवर दिला होता मोठा निर्णय
गवई यांना दीर्घ न्यायिक अनुभव
24 नोव्हेंबर 1960 रोजी अमरावतीत जन्मलेले न्यायमूर्ती गवई यांना 14 नोव्हेंबर 2003 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून बढती मिळाली होती. ते 12 नोव्हेंबर 2005 रोजी उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश बनले. न्यायमूर्ती गवई सर्वोच्च न्यायालयात अनेक घटनापीठांचा भाग राहिले आहेत, ज्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निकाल दिले आहेत.