पीटीआय, नवी दिल्ली: न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची मंगळवारी भारताचे पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते 14 मे रोजी सरन्यायाधीश पदाचा कार्यभार स्वीकारतील. 13 मे रोजी विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाळ संपत आहे.

विधी मंत्रालयाने एक अधिसूचना जारी करून न्यायमूर्ती गवई यांची भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा केली.

शिफारशीनंतर नियुक्ती

ठरलेल्या प्रक्रियेनुसार, 16 एप्रिल रोजी सरन्यायाधीश खन्ना यांनी त्यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. न्यायमूर्ती गवई यांचा कार्यकाळ सहा महिन्यांचा असेल आणि वयाची 65 वर्षे पूर्ण झाल्यावर ते 23 डिसेंबर रोजी पदावरून निवृत्त होतील. ते विद्यमान सरन्यायाधीश खन्ना यांच्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश आहेत.

दीर्घ न्यायिक अनुभव

24 नोव्हेंबर 1960 रोजी अमरावतीत जन्मलेले न्यायमूर्ती गवई यांना 14 नोव्हेंबर 2003 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून बढती मिळाली होती. ते 12 नोव्हेंबर 2005 रोजी उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश बनले. न्यायमूर्ती गवई सर्वोच्च न्यायालयात अनेक घटनापीठांचा भाग राहिले आहेत, ज्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निकाल दिले आहेत.