जेएनएन, छत्रपती संभाजीनगर. औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून उखडून टाका अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होते आहे. तसंच 17 मार्च रोजी औरंगजेबाची कबर उखडण्याच्या मुद्द्यावरुन दंगलही उसळली होती. त्यानंतर आता औरंगजेबाची कबर झाकून ठेवण्यात आली आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली खुलताबादला भेट

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी एएसआय अधिकाऱ्यांसमवेत खुलताबाद येथील कबरीला भेट दिल्यानंतर दोन दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला. तसंच, छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी खुलताबाद वरुन ड्रोन उडवण्यास 18 एप्रिल पर्यंत मनाई केली आहे. तसंच खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर आणि परिसर हा रेड झोन म्हणून काही काळासाठी जाहीर करण्यात आला आहे.

ड्रोनसाठी या भागात मनाई 

याबाबत पोलिसांचं असं म्हणणं आहे की, औरंगजेबाच्या कबरीची तोडफोड आणि नासधूस होण्याची शक्यता आहे. तसंच त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यानंतर ड्रोनसाठी या भागात मनाई करण्यात आली आहे.

    कबरीच्या ठिकाणी कुंपण

    बुधवारी रात्री या वास्तूच्या दोन बाजूंना पत्रे आणि तारेचे कुंपण लावण्यात आले, असे एका स्थानिक अधिकाऱ्याने सांगितले. कबरेभोवती गोलाकार कुंपणही बसवण्यात येणार आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. "कबरेच्या दोन बाजूंना असलेले हिरवे जाळे खराब झाले होते आणि जवळच्या ख्वाजा सय्यद जैनुद्दीन चिश्ती यांच्या कबरीला भेट देणाऱ्यांना ही वास्तू दिसत होती. त्यामुळे आम्ही पत्र्याचे आवरण लावले आहे," असे त्यांनी  सांगितले.