Lek Ladki Scheme In Maharashtra : राज्यात सध्या सगळीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) चर्चा होत आहे. या योजनेची नवीन नोंदणी बंद झाल्याने खळबळ उडाली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रतिमहा 1500 रुपये मिळतात. पण राज्यातील मुलींना तब्बल 1,01,000 रुपयांची आर्थिक मदत करणाऱ्या 'लेक लाडकी' या योजनेविषयी (Lek Ladki Yojana) अनेकांना माहिती नाही. या योजनेच्या माध्यमांतून मुलींना अर्थसहाय्य केले जाते. जाणून घेऊया ही योजना नेमकी आहे काय व काय आहेत यासाठी पात्रता व अर्ज करण्याची पद्धत (lek ladki yojana application process)
लेक लाडकी योजनेचा उद्देश्य -
महाराष्ट्र सरकारने राज्य सरकारने 1 एप्रिल 2023 पासून माझी कन्या भाग्यश्री या योजनेत सुधारणा करून लेक लाडकी ही योजना सुरू केली. मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देणे, मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणाला चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे, बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहन देणे अशी या योजनेची उद्दिष्टे आहेत. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार सुमारे रु 1 लाख 1 हजार रुपयांची आर्थिक मदत पात्र लाभार्थ्यांना 5 वेगवेगळ्या टप्प्यांवर करणार आहे.
महाराष्ट्र लेक लाडकी योजनेंतर्गत राज्यातील मुलींना खालील टप्प्यांवर आर्थिक सहाय्य दिले जाईल -
जन्माच्या वेळी - 5,000
मुलीने इयत्ता पहिलीत प्रवेश घेतल्यानंतर - 6,000
मुलगी सहावीच्या वर्गात गेल्यानंतर - 7,000
जेव्हा मुलगी 11वी मध्ये प्रवेश घेते- 8,000
मुलगी 18 वर्षांची झाल्यावर - 75,000
- अशा पद्धतीने या योजनेतून सुमारे एक लाख एक हजार रुपये लाभार्थ्यांना मिळतात.
लेक लाडकी योजनेसाठी पात्रता -
- महाराष्ट्र लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता अटी पूर्ण करणे आवश्यक आहे :-
मुलींचे पालक महाराष्ट्राचे कायमचे रहिवासी असावेत.
लाभार्थ्याकडे पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड असावे.
मुलीचा जन्म 1 एप्रिल 2023 रोजी किंवा नंतर झाला पाहिजे.
आवश्यक कागदपत्रे
- महाराष्ट्र लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत :-
- महाराष्ट्राचा रहिवासी पुरावा.
- लाभाथीचा जन्माचा दाखला
- मुलींच्या पालकांचे आधार कार्ड.
- मुलीचे आधार कार्ड. (प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील)
- मुलीचा जन्म दाखला
- बँक खाते तपशील.
- मोबाईल नंबर.
- उत्पन्न प्रमाणपत्र.
- पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड.
- मुलीचा पासपोर्ट आकाराचा फोटो.
- मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभाकरिता 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला)
- संबंधित टप्प्यावरील लाभासाठी शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला (Bonafied)
- योजनेच्या अंतिम लाभासाठी मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील, (अविवाहीत असल्याबाबत लाभार्थीचे स्वयं घोषणापत्र).
लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्याची कार्यपध्दती:
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या पालकांनी 1 एप्रिल 2023 रोजी वा त्यानंतर मुलीचा जन्म झाल्यावर संबंधित ग्रामीण अथवा नागरी क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेत मुलीच्या जन्माची नोंदणी करावी.
त्यानंतर त्या क्षेत्रातील आंगणवाडी सेविकेकडे योजनेच्या अटी व शर्तीनुसार आवश्यक त्या कागदपत्रांसह विवित नमुन्यात अर्ज सादर करावा.
हे ही वाचा -Ladaki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने नोंदणी बंद? लाभापासून वंचित महिलांनी आता काय करायचं..
लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कुठे मिळेल?
लेक लाडकी योजनेसाठी विहित नमुन्यातील अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद, महिला व बालविकास अधिकारी, विभागीय उपायुक्त- महिला व बालविकास कार्यालयात उपलब्ध होतील. लाभार्थ्यांनी अंगणवाडी सेविकांकडून विहित नमुन्यात आणि आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरून घ्यावा व तो अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्यसेविका यांच्याकडे सादर करावा.