Mazi Ladki Bahin Yojana : लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने अर्थसंकल्पात महिलांसाठी एक योजना (Government scheme) जाहीर केली होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ( Ladki Bahin Yojana) असे नाव या योजनेला देण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीत ही योजना गेमचेंजर ठरली आणि महाराष्ट्राच्या सत्तेच्या चाव्या पुन्हा महायुतीच्या ताब्यात आल्या. निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेसाठी निधी उपलब्ध करताना सत्ताधाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. त्यातच आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. वरळी डोम येथे पार पडलेल्या विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांनी योजनेसाठी नव्याने नोंदणी बंद झाल्याचे त्यांनी सांगितले.

लाडकी बहीण योजने संदर्भात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी सुरू केलेले पोर्टल बंद करण्यात आले आहे. त्यामुळे योजनेसाठी नव्याने नोंदणी होणार नाही. ठाकरेंच्या दाव्यानंतर लाडकी बहीण योजनेवरून आता उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

योजनेसाठी निधीची कमतरता -

लाडकी बहीण योजनेसाठी सरकारच्या अन्य विभागाकडून निधी वळवण्यात येत आहे. समाज कल्याण विभागाचा निधी वळवल्याने विरोधकांकडून सरकारवर टीका करण्यात येत आहे. योजनेच्या माध्यमातून महिलांना 11 हफ्ते  मिळाले असून जून 2025 च्या हफ्त्याची प्रतीक्षा केली जात आहे. सध्या योजनेत लाभार्थी महिलांना 1500 रुपयांचा हप्ता दिला जात असून त्यासाठी पैसे कुठून आणायचे, असा प्रश्न सरकारपुढे आहे. त्यातच लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर नव्याने नोंदणी होणार नसल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

अर्ज न केलेल्या व रिजेक्ट केलेल्या महिलांचे काय ?

लाडकी बहीण योजनेच्या अतंर्गत 21 ते 65 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ मिळत आहे. पण ही योजना लागू झाली तेव्हा 21 वर्षे पूर्ण झाले नव्हते पण आता 21 वर्षे पूर्ण झाले आहे अशा तरुणींची संख्या मोठी आहे. त्याबरोबरच ज्या महिलांना यापूर्वी अर्ज करता आला नाही, त्या आता नव्याने नावनोंदणी सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. नव्याने अर्जप्रक्रिया राबविण्याबाबत सरकारकडून कोणताच निर्णय न झाल्याने  महिलांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. या योजनेसाठी पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा आर्थिक लाभ देण्यात येतो. मात्र, अशा काही महिला आहेत ज्यांना या योजनेसाठी अर्ज करता आला नाही. तसेच नुकत्याच 21व्या वर्षात पदार्पण केलेल्या महिलांनाही या योजनेचा लाभ घेता येत नाहीये. 

    या महिलांना जर योजनेचा लाभ देण्याचा निर्णय झाल्यास लाडकी बहीण योजनेस मुदतवाढ मिळेल आणि अर्ज करुन नाव नोंदणी करण्याबाबत अद्याप तरी कोणताही निर्णय झालेला नाही.

    गेल्या 9 महिन्यापासून नाव नोंदणी बंद-

    गेल्या नऊ महिन्यांपासून या लाडकी बहीण योजनेसाठी इच्छुक महिलांसाठी नवीन नोंदणी प्रक्रिया बंद आहे. योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर होती. त्यानंतर नऊ महिने उलटून गेले असले तरी सरकारने अद्याप नवीन अर्जदारांसाठी नोंदणी पुन्हा सुरू केलेली नाही. त्यातच आता योजनेसाठी सुरू करण्यात आलेले पोर्टलच बंद केल्याची चर्चा आहे. सरकारकडून लाभ घेत असलेल्या महिलांच्या अर्जांची छाननी केली जात आहे. जवळपास 13 लाख महिलांना योजनेतून वगळले. सध्या हजारो महिला या योजनेपासून वंचित आहेत. सध्या जवळपास अडीच कोटी महिलांच्या खात्यांत प्रति महिना 1500 रुपयांचा निधी जमा करण्यात येत आहे.