Construction Workers Welfare Scheme : राज्यात लाडकी बहीण योजनेनंतर इमारत बांधकाम कामगार कल्याण योजनेची चर्चा सुरू आहे. कामगार वर्गातील लाभार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचा सरकारकडून प्रयत्न केला जात आहे. इमारत बांधकाम कामगार मंडळ अंतर्गत नोंदणीकृत कामगारांना या योजनेअंतर्गत सुरक्षा किट आणि स्वयंपाक गृहातील भांड्यांचा सेट वितरित केला जात आहे. मात्र या योजनेसाठी ऑफलाइन अर्ज प्रक्रिया बंद करण्यात आली असून ज्यांनी अद्याप या योजनेसाठी अर्ज केला नसेल त्यांच्यासाठी महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे.
इमारत बांधकाम कामगार कल्याण योजना काय आहे ?
बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत इमारत बांधकाम कामगारांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. यामध्ये शिक्षण सहाय्यता, आरोग्य सुविधा, मातृत्व लाभ, अपघाती मृत्यूनंतर आर्थिक मदत, सेवानिवृत्ती लाभ, गृहबांधणीसाठी अनुदान आणि विवाह सहाय्यता योजना यांचा समावेश आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे. सरकारकडून या योजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येतो.
राज्यातील ३५८ सेतू केंद्रातून झाली नोंदणी -
बांधकाम कामगारांना काम सोडून नोंदणीसाठी हेलपाटे मारायला लागू नये म्हणून राज्य सरकारकडून तालुक्याच्या ठिकाणी ‘तालुका कामगार सुविधा केंद्र’ अर्थात सेतू केंद्र स्थापन करण्यात आले होते. राज्यात 358 सेतू केंद्र चालू करण्यात आली होती.
सध्या सेतू केंद्रांमार्फत नोंदणी प्रक्रिया बंद -
बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या आदेशानुसार दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एन्ट्रीचे काम बंद करण्यात आले आहे. बांधकाम कामगार आपले नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज online पद्धतीने आपल्या सोयीच्या जवळच्या ठिकाणांवरून भरू शकतील. अर्ज भरल्यावर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल. ६ फेब्रुवारी २०२५ पासून या तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे. निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रांसह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर रहावे लागेल. ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येतील.
योजनेसाठी नवीन नोंदणी प्रक्रिया -
कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकतात. नवीन तारीख निवडण्यासाठी “Change Claim Appointment Date ” ह्या बटनावर क्लिक करावी. नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर रजिस्टर मोबाइलवर एक OTP येईल. OTP पडताळल्यानंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याचा पोचपावती क्रमांक भरावयाचा आहे. त्यानंतर तुम्ही कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकता. त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये सबमिट करू शकता.
नोंदणीसाठी आवश्यक पात्रता निकष
18 ते 60 वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार
मागील बारा महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार.
हे ही वाचा -Ladaki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने नोंदणी बंद? लाभापासून वंचित महिलांनी आता काय करायचं..
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
मंडळात नोंदणी करण्याकरीता फॉर्म – V भरुन खालील प्रमाणे दस्तऐवजासह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे…
• वयाबाबतचा पुरावा
• मागील वर्षभरात 90 दिवस किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
• पासपोर्ट आकारातील 3 रंगीत फोटो
• रहिवासी पुरावा (Address Proof)
• फोटो आयडी पुरावा
• बँक पासबुकची झेरॉक्स
नोंदणी फी – रू. 1/- व वार्षिक वर्गणी रू. 1/-
कामगाराने नोंदणी केल्यानंतर नोंदणी जीवित असेपर्यंत त्या कामगारास मंडळाच्या सर्व योजनांचे लाभ घेण्यासाठी तो पात्र ठरतो.
बांधकाम कामगार कल्याण योजनेचे लाभ -
• नोंदीत लाभार्थी स्त्री बांधकाम कामगारांस तसेच नोंदित पुरुष लाभार्थी बांधकाम कामगारांच्या पत्नीस दोन जिवीत अपत्यांपर्यंत नैसर्गिक प्रसुतीसाठी 15 हजार व शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी 20 हजाराचे अर्थ सहाय्य मिळते.
• बांधकाम कामगारांच्या दोन पाल्यांस पहिली ते सातवीसाठी दरवर्षी अडीच हजार आणि इयत्ता 8 वी ते 10 वी साठी प्रतिवर्षी 5,000 शैक्षणिक आर्थिक सहाय्य.
• लाभार्थ्यांच्या पाल्यांना इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी मध्ये किमान 50% किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास 10,000 प्रोत्साहनात्मक शैक्षणिक सहाय्य.
• लाभार्थी कामगारांच्या 2 पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेश, पुस्तके व शैक्षणिक सामुग्रीसाठी प्रतिवर्षी 20,000 आर्थिक मदत.
• कामगारांच्या 2 पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयात किंवा संस्थेत प्रवेश घेण्यासाठी, पुस्तके व शैक्षणिक साहित्य खरेदी इत्यादीसाठी प्रती शैक्षणिक वर्षी वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरीता एक लाख आणि अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरीता 60 हजारांचे शैक्षणिक सहाय्य.
• शासनमान्य पदविकेमध्ये शिक्षण घेत असलेल्या पाल्यास प्रती शैक्षणिक वर्षी 20 हजार फक्त आणि पदव्युतर पदविकामध्ये शिक्षण घेत असलेल्या प्रती शैक्षणिक वर्षी पंचवीस हजार एवढे आर्थिक सहाय्य.
• नोंदित लाभार्थी कामगार अथवा त्याच्या पती / पत्नीने एका मुलीच्या जन्मानंतर कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे १८ वर्षांपर्यंत एक लाख रूपये मुदत बंद ठेव.
• लाभार्थी कामगारांस 75% किंवा कायमचे अपंगत्व आल्यास त्यास दोन लाख रुपये एवढे आर्थिक सहाय्य.
• नोंदित लाभार्थी कामगाराचा मृत्यु झाल्यास त्याच्या वारसास 10 हजार एवढी रक्कम अंत्यविधीसाठी मदत.
• नोंदित लाभार्थी कामगाराचा मृत्यु झाल्यास त्याच्या विधवा पत्नी अथवा स्त्री कामगाराचे विधुर पतीस पाच वर्षापर्यंत प्रतिवर्षी 24 हजार एवढे आर्थिक सहाय्य.
• नोंदित लाभार्थी बांधकाम कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास पाच लाखांची नुकसान भरपाई.
• लाभार्थी कामगार व त्यांच्या कुटूंबियांना गंभीर आजाराच्या उपचारार्थ एक लाख एवढे वैद्यकिय सहाय्य
• लाभार्थी बांधकाम कामगाराच्या स्वत:च्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपुर्तीसाठी 30 हजार रूपये अनुदान.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना अवजारे खरेदी करण्याकरीतापाच हजार अर्थसहाय्य.