जेएनएन, नाशिक. Sanjay Raut on alliance with MNS: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे अनेक नेते विविध वक्तव्य करत आहेत. यातच आता शिवसेना (यूबीटी) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य केलं आहे. आम्ही शेवटपर्यंत सकारात्मक प्रतिसाद देत आहोत, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

आम्ही तुमचे स्वागत करण्यास तयार 

"आम्ही शेवटपर्यंत सकारात्मक प्रतिसाद देत राहिलो. आम्ही महाराष्ट्रातील लोकांना आणि इतर सर्वांना सांगू इच्छितो की जर तुम्हाला असे वाटत असेल की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्र आले पाहिजेत, तर आम्ही आमच्याकडून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आमची भूमिका फक्त एकच आहे की, तुम्ही इतर नेत्यांशी हातमिळवणी करू नका आणि महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचे स्वागत करू नका, मग ते भाजप असो किंवा एकनाथ शिंदे असोत. बस्स, बाकी आम्ही तुमचे स्वागत करण्यास तयार आहोत." असं संजय राऊत यांनी नाशिकमध्ये म्हटले आहे. ते सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत.

सर्वांचं लक्ष लागलं

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे हे त्यांचे बंधू महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत युती करणार आहेत, अशी चर्चा सुरु आहे. यात आता संजय राऊत यांनी त्यांचे स्वागतही केलं आहे. मात्र, यासाठी ठाकरे गटानं राज ठाकरे यांच्या पुढे एक अट किंवा भूमिका ठेवली आहे. त्यांच्याकडे मनसे गट आणि राज ठाकरे हे कसे पाहतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

    तर महायुतीला मोठा फटका

    येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत जर मनसे आणि ठाकरे गट यांच्यात युती झाली. तर ही बाब महायुतीतील पक्षासाठी मोठा धक्का देणारी असू शकते, असं चर्चा सुरु आहे. कारण, आजही ठाकरे परिवाराला मानणार मोठा वर्ग हा मुंबई आणि महाराष्ट्रात आहे आणि याचा मोठा फटका हा महायुतीला बसू शकतो.