जेएनएन, मुंबई. ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील (मनसे) संभाव्य युतीबाबत पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थावर जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 40 ते 45 मिनिटे सविस्तर चर्चा झाली.
शिवसेना–मनसे युतीसाठी जागावाटप अंतिम टप्प्यात आल्याचे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत. जागावाटपाबाबतची चर्चा सकारात्मक दिशेने सुरू असून, याबाबत आज पुन्हा दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठक होणार असल्याची माहितीही राऊत यांनी दिली.
नगरपालिका निवडणुकांच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर चर्चा
राज्यभरातील नगरपरिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत असतानाच मुंबईत ही महत्त्वाची भेट झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांची पुढील रणनिती काय असावी, यावर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.
शिवतीर्थावरील भेटीनंतर संजय राऊत आणि राज ठाकरे यांनी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्यासोबतही चर्चा केली. या बैठकीत युतीसंदर्भातील पुढील पक्ष धोरण, निवडणूक रणनीती आणि समन्वयाबाबत सकारात्मक संवाद झाल्याचे समजते.
युतीबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता
शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवी समीकरणे तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः मुंबई आणि शहरी भागात या युतीचा काय परिणाम होईल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
