जेएनएन, मुंबई. एकसंघ शिवसेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांचं निधन झालं आहे. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सोमवारी लिलावती रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नांदेकर यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्यावर गेल्या एक महिन्यांपासून मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती खालवली होती. वणी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
नांदेकर हे आक्रमक शिवसैनिक म्हणून परिचित होते. तालुका प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा त्यांचा प्रवास होता. विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना शिंदे गटात नांदेकर यांनी पक्षप्रवेश केला होता. त्यामुळे ते चंद्रपूर यवतमाळ लोकसभा समन्वयक होते. यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्राचे ते आमदार होते.
कर्तृत्ववान व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड
माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या निधनानं सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारं, सामाजिक बांधिलकी जपणारं एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलंय. माजी आमदार नांदेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

माझे स्नेही, मोठे बंधू माजी आमदार विश्वास नांदेकर सर यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात तसेच लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने शिवसेना परिवारातील खंबीर साथ देणारा आधार हरपला आहे, अशी शोकभावना मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केली आहे.

