सातारा. Satara district bank election result Winner List: साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटणमध्ये बाजी मारली आहे. शंभुराज देसाईंनी त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी सत्यजितसिंह पाटणकर आणि पर्यायाने भाजपला मोठा धक्का दिला आहे. तब्बल 42 वर्षांनी जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत पाटणमध्ये देसाई गटाने पुनरागमन गेले आहे. पाटणमधील जागेसाठीच्या एकूण 103 ठरावांपैकी 58 ठराव हे आपल्या बाजूने वळवण्यात शंभुराज देसाई यांना यश मिळाले. हा शंभुराज देसाई आणि शिंदे गटासाठी मोठा विजय मानला जात आहे.

या निवडणुकीत 21 जागांपैकी 12 जागांवर निवडणूक झाली.  यामध्ये माण तालुक्यात मंत्री जयकुमार गोरे विरुद्ध शेखर गोरे, फलटण तालुक्यात संजीवराजे नाईक निंबाळकर विरुद्ध समशेर सिंह नाईक निंबाळकर आणि पाटणमध्ये मंत्री शंभूराज देसाई विरुद्ध सत्यजित पाटणकर अशी प्रमुख लढत पाहायला मिळाली. या लढतीत शिंदे गटाचे शंभुराज देसाई यांचा मोठा विजय झाला. 

शंभुराज देसाई यांनी याआधी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपला क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, एक जागा सत्यजितसिंह पाटणकरांच्या गटाला मिळाली होती. परंतु, आता सातारा जिल्हा बँकेच्या पाटण सोसायटीतील विजयाने शंभुराज देसाई यांनी सहकारी जिल्हा बँक, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती अशा सर्व स्तरांवरील आपली ताकद सिद्ध केली आहे. 

विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते

जावळी सोसायटी मतदारसंघ 

1) ज्ञानेश्वर रांजणे 38 मते विजयी भाजप

    2) विठ्ठल गोळे 8 मते राष्ट्रवादी

    जावळी तालुका सोसायटी मतदारसंघात विद्यमान संचालक ज्ञानदेव रांजणे दुसऱ्यांदा विजयी झाले. त्यांना 38 मते मिळाली तर विरोधी उमेदवार विठ्ठल गोळे यांना अवघी 8 मते पडली.

    खंडाळा सोसायटी मतदारसंघ

    1) अजय भोसले राष्ट्रवादी 28 मते

    2) संजीव गाढवे भाजप 21 मते

    3) शामराव गाढवे अपक्ष शून्य मते

    खंडाळा सोसायटी मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अजय भोसले 28 मते मिळवून विजयी झाले. त्यांनी भाजप उमेदवार संजीव गाढवे यांचा पराभव केला. गाढवे यांना 21 मते मिळाली.

    महाबळेश्वर सोसायटी मतदार संघ

    1) रुपाली राजपुरे राष्ट्रवादी 8 मते विजयी

    2) संजय मोरे शिवसेना 4 मते

    महाबळेश्वर सोसायटी मतदार संघातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली राजपुरे विजयी झाल्या. राजपुरे यांना 8 मते आणि शिवसेनेच्या संजय मोरे यांना 4 मते मिळाली. दोन्ही विजयी उमेदवार मंत्री मकरंद पाटील यांचे निकटवर्तीय आहेत.

    पाटण सोसायटी मतदारसंघ

    1)शंभूराज देसाई शिवसेना 58 मते विजयी

    2) सत्यजीत पाटणकर भाजप 46 मते

    पाटण तालुका सोसायटी मतदार संघातून पालकमंत्री शंभूराज देसाई 58 मते मिळवून विजयी झाले. त्यांनी विद्यमान संचालक आणि पारंपरिक विरोधक सत्यजितसिंह पाटणकर यांचा 12 मतांनी पराभव केला. भाजप उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर यांना 46 मते मिळाली.

    माण सोसायटी मतदारसंघ

    1) जयकुमार गोरे भाजप 53 मते

    2 मनोज पोळ राष्ट्रवादी 14 मते

    3) शेखर गोरे शिवसेना 7 मते

    राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मान तालुका सोसायटी मतदारसंघात भाजी मारली आहे. मंत्री गोरे यांना 53 मते मिळाली. शिवसेनेत प्रवेश करून त्यांच्या विरोधात उभे राहिलेले सख्खे बंधू शेखर गोरे यांना 7 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मनोज पोळ यांना 14 मते मिळाली. 

    फलटण -

    संजीवराजे निंबाळकर-71 मते 

    समशेरसिंह निंबाळकर - 60 मते

    फलटण तालुका सोसायटी मतदारसंघात निंबाळकर घराण्यात जोरदार मुकाबला झाला. त्यात रामराजे निंबाळकर यांचे चुलत बंधू आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजीवराजे निंबाळकर विजयी झाले. त्यांना 71 मते मिळाली.