सांगली/सातारा. District Bank Election Result 2026: शिक्षक व पदवीधर निवडणुकीनंतर राज्यात जिल्हा बँकांच्या निवडणुकीची जोरदार चर्चा रंगली आहे. महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या सातारा, सांगली आणि अहमदनगर या तीन ठिकाणी झालेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. आज (मंगळवार) सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. त्यानंतर सातारा आणि सांगली जिल्हा बँक निवडणुकीच्या पहिल्या दीड तासाच्या मतमोजणीतच महत्त्वाचे निकाल समोर आले. अहिल्यानगर जिल्हा बँकेचे निकालही स्पष्ट झाले आहेत.
Sangli District Bank Election Result 2026 गोपीचंद पडळकर, अजित घोरपडे व संजय काकांनी उधळला विजयाचा गुलाल
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीतील सहा जागांसाठी आज मिरजेत मतमोजणी पार पडत आहे. सहा जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात होते. मतदान झालेल्या सहापैकी सोसायटी गटाच्या चार जागांमध्ये मोठी रस्सीखेच आहे.
जतमध्ये आ. गोपीचंद पडळकर विरुद्ध विनोद पवार, तासगावमध्ये माजी खासदार संजय पाटील विरुद्ध माजी आमदार सुमन पाटील, तर कवठेमहांकाळला माजी मंत्री अजितराव घोरपडे विरुद्ध टी. व्ही. पाटील यांच्यात काट्याची टक्कर असल्याने निकालाकडे लक्ष लागले होते. जिल्हा बँकेच्या २१ जागांपैकी १५ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत.
जत सोसायटी गटातून आमदार गोपीचंद पडळकर यांचा विजय झाल्याची माहिती समोर आली आहे. जत सोसायटी गटातून आमदार पडळकर 54 मतांनी विजयी झाले आहेत. विरोधी उमेदवार विनोद पवार यांना 34 मते पडली आहे. पडळकर 20 मतांनी विजयी झाले.
तासगाव सोसायटी गटातून अवघ्या दोन मतांनी माजी खासदार संजय काका पाटील विजयी झाले आहेत. त्यांनी माजी आमदार सुमन ताई पाटील यांचा पराभव केला. संजयकाका पाटील यांना 40 मतं मिळाली तर सुमनताई पाटील यांना 38 मतं मिळाली.
मिरज सोसायटी गटातून खासदार विशाल पाटील समर्थक अण्णासाहेब कोरे 46 मते मिळवून विजयी झाले आहेत. कवठेमहांकाळ सोसायटी गटामधून अजितराव घोरपडे यांचा विजय झाला. त्यांनी आमदार रोहित पाटील गटाच्या टी. व्ही. पाटील यांचा पराभव केला. अजितराव घोरपडे यांना 37 मतं मिळाली तर टी.व्ही. पाटील यांना 21 मते मिळाली.
Satara District Bank Election Result 2026: शंभुराज देसाई गटाचा विजय
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत झालेल्या अटीतटीच्या लढाई झाली. साताऱ्यामधील लढतीत साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बाजी मारली. या निवडणुकीत शंभूराज देसाई यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी भाजप नेते सत्यजितसिंह पाटणकर यांचा पराभव केला. पाटण सोसायटीत शंभुराज देसाई यांना 42 वर्षांनी विजय मिळाला आहे.या लढतीत जयकुमार गोरे यांनीही बाजी मारली. माण सोसायटी गटातून जयकुमार गोरे यांनी त्यांचे बंधू शेखर गोरे यांचा पराभव केला. जयकुमार गोरे यांना 53 मतं मिळाली, तर राष्ट्रवादीच्या मनोज पोळ यांना 14 आणि शेखर गोरे यांना अवघी सात मतं मिळाली. फलटण सोसायटीमधून संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा विजय झाला असून समशेरसिंह निंबाळकर यांना पराभव सहन करावा लागला आहे. समशेरसिंह नाईक निंबाळकर हे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू आहेत.ॉ
AhilyaNagar District Bank election Result : अहिल्यानगर जिल्हा बँकेत खा.निलेश लंकेंची विखे पाटलांवर मात
पारनेर सेवा सहकारी संस्था मतदार संघातून खासदार निलेश लंके विजयी झाले आहेत. लंके यांना 104 पैकी 63 मतं मिळाली. 21 पैकी 11 जागा यापूर्वीच बिनविरोध आल्या आहेत. पारनेरमध्ये निलेश लंके विरुद्ध विखे समर्थक राहुल शिंदे यांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष होतं. यात निलेश लंके यांनी बाजी मारली आहे.
