अहिल्यानगर. Ahilyanagar DCC Bank Election Result 2026: राज्यातील सांगली, सातारा व अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचे निकाल आज समोर येत आहेत. अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत यंदा मोठी राजकीय चुरस पाहायला मिळाली. संचालकपदाच्या 21 जागांपैकी 11 जागा बिनविरोध झाल्या, तर उर्वरित 10 जागांसाठी कांटे की टक्कर बघायला मिळाली. चार जागांवरील चित्र स्पष्ट झालं आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा मोठा नेता पडला आहे. तर भाजप नेते राधाकृष्ण विखेंना मोठा धक्का बसला आहे.
पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी विखे-थोरात यांच्या सहकार पॅनलविरोधात निलेश लंके यांच्या परिवर्तन पॅनलने थेट लढत झाली. पारनेरमध्ये निलेश लंके विरुद्ध विखे समर्थक राहुल शिंदे यांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होतं. विखेंसाठी ही प्रतिष्ठेची लढत आहे. यात निलेश लंके यांनी बाजी मारली आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या पारनेर सेवा सोसायटी मतदारसंघातून खासदार नीलेश लंके यांनी प्रतिस्पर्धी आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील गटाचे उमेदवार राहुल शिंदे यांचा पराभव केला.
विद्यमान आमदार किरण लहामटे यांना पराभवाचा धक्का -
अकोले सेवा सोसायटी मतदारसंघातून विद्यमान आमदार किरण लहामटे यांना अनपेक्षित पराभव झाला आहे. येथे संजीवनी शिंदे विजयी झाल्या आहेत. संजीवनी शिंदे विजयी यांना 49 मतं पडली आहेत. तर आमदार किरण लहामटे यांना 36 मते मिळाले. त्यांचा 13 मतांनी पराभव झाला आहे.
कर्जतमधून राम शिंदे यांच्या पॅनेलच्या ज्योती प्रकाश शिंदे विजयी झाल्या आहेत. त्यांनी तुषार पिसाळ यांचा 34 मतांनी पराभव केला आहे. इथून ज्योती शिंदे यांना 54 तर तुषार पिसाळ यांना 20 मतं मिळाली.
राहुरीमधून प्राजक्त तनपुरे विजयी झाले असून त्यांना 89 मतं मिळाली आहेत. तर त्यांच्याविरोधात निवडणूक लढणारे कदम यांना केवळ 18 मतं मिळाली. पारनेरमध्येही अत्यंत चुरशीची लढत बघायला मिळाली. येथे 64 मतं घेत निलेश लंके विजयी झाले. तर भाजपच्या राहुल शिंदेंना 40 मतांवर समाधान मानावं लागलं.
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँक विजयी उमेदवार यादी
1 पारनेर – निलेश लंके (64 मते)
2. अकोले – संजीवनी शिंदे (49 मते)
3. कर्जत – ज्योती प्रकाश शिंदे (54 मते)
4. राहुरी – प्राजक्त तनपुरे (89 मते)
सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनल थेट सामना -
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील पारंपरिक विरोधक एकत्र येत स्थापन केलेल्या ‘सहकार पॅनल’विरुद्ध खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखालील ‘परिवर्तन पॅनल’ अशी थेट लढत झाली.
