जेएनएन, पुणे. NDA 148th Course Passing Out Parade: पुण्यातील राष्ट्रीय संरक्षक प्रबोधिनी म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकादमीनं (NDA) इतिहास घडवला आहे. इतिहासात पहिल्यांदाच आज येथून महिला कॅडेडची तुकडी सैन्यात रुजू होणार आहे. त्यांचा आज दीक्षांत संचालन म्हणजेच पासिंग आउट परेडचा सोहळा पार पडला. माजी लष्करप्रमुख आणि मिझोरमचे सध्याचे राज्यपाल जनरल व्ही के सिंग हे पासिंग आउट परेडचे पुनरावलोकन अधिकारी होते. 

एनडीएच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला सिल्व्हर मेडल 

एनडीएतून भारतीय सैन्य दलात रुजू होणारी ही 148 वी तुकडी असणार आहे. यामध्ये एकूण 17 मुलींसह 300 हून अधिक पुरुष कॅडेट्सचा समावेश आहे. यामध्ये कला शाखेत श्रिती दक्ष हिला सिल्व्हर मेडल प्रदान करण्यात आले. एनडीएच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला सिल्व्हर मेडल मिळाले आहे. 

2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर युपीएससी (युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन) ने महिलांना संरक्षण अकादमीमध्ये अर्ज करण्याची परवानगी दिल्यानंतर 2022 मध्ये महिला कॅडेट्सची पहिली तुकडी एनडीएच्या 148 व्या कोर्समध्ये सामील झाली. या कोर्सच्या परेडचे नेतृत्व अकादमीचे कॅडेट कॅप्टन उदयवीर नेगी यांनी केले.

एकूण 339 कॅडेट्सचा दीक्षान्त समारंभ पार 

या टुकडीमध्ये बीएससी शाखेत 84 विद्यार्थी, बीएससी कम्प्युटर सायन्स 85 विद्यार्थी, कला शाखेतील 59 विद्यार्थी आणि बीटेकमधील 111 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एकूण 339 कॅडेट्सचा दीक्षान्त समारंभ पार पडला. यावेळी एनडीए कमांडंट व्हाइस अॅडमिरल गुरचरण सिंग, एअर व्हाइस मार्शल सिद्धार्थ बेदी यांच्यासह एनडीएच्या वेगवेगळ्या विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

    फक्त त्यासाठी प्रयत्न करा

    "नियती किंवा योगायोग असे काही नसते. तुम्हाला काय हवे आहे आणि तुम्ही काय साध्य करता यावरच हे अवलंबून असते. मला सैन्यात सामील व्हायचे होते, म्हणून मी त्यासाठी प्रयत्न केले आणि ते साध्य करण्यात यशस्वी झालो. फक्त त्यासाठी प्रयत्न करा..." असं कॅडेट हरसिमरन कौर म्हणाल्या. 

    सुर्यकिरण विमानांची नेत्रदिपक प्रात्यक्षिके

    दरम्यान, पासिंग आऊट परेडदरम्यान हवाई दलाच्या सुर्यकिरण या विमानांची नेत्रदिपक प्रात्यक्षिकंह यावेळी सादर होतात. यावेळी उपस्थित पाहुण्यांसाठी हा संपूर्ण सोहळा पाहणं ही एक पर्वणीच असते. कारण एनडीएचा गौरवशाली इतिहास जवळून अनुभवण्याची संधी त्यांना मिळते. यंदाचा पासिंग आऊट परेड सोहळा असाच उत्साहात पार पडला.