जेएनएन, नागपूर. Nagpur Crime News: नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका महिलेनं कारगिलमधील हुंडरमन गावाजवळील नियंत्रण रेषा (LoC) ओलांडून पाकिस्तानात प्रवेश केला. या आरोपाखाली नागपुरातील संत कबीर नगरमधील 43 वर्षीय सुनीता गटलेवार या महिलेवर हेरगिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूरमधील कपीलनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेकायदेशीरपणे पाकिस्तानात घुसल्यानंतर…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीता ही बेकायदेशीरपणे पाकिस्तानात घुसल्यानंतर पाकिस्तानी रेंजर्सनी तिला अडवले आणि नंतर भारतीय आणि पाकिस्तानी सैन्यादरम्यान झालेल्या ध्वज बैठकीदरम्यान तिला भारतात परत पाठवण्यात आलं. त्यानंतर सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) तिला अमृतसर पोलिसांकडो सोपवले, ज्यांनी अमृतसर ग्रामीणमधील घरिंदा पोलिस स्टेशनमध्ये शून्य एफआयआर नोंदवत हे प्रकरण नागपूर अधिकारक्षेत्रात वर्ग केले.
2 जूनपर्यंत पोलिस कोठडी
कपिल नगर पोलिसांच्या दोन महिला कर्मचाऱ्यांसह एका पथकाने सुनीता यांना नागपूरला परत आणले. त्यानंतर सुनीताला बुधवारी मध्यरात्री दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने सुनीताला 2 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. त्यानंतर गुप्तचर विभाग (आयबी) आणि स्थानिक पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू आहे.
पाकिस्तानमधील एका धर्मगुरूशी सतत संवाद
तपासादरम्यान, पोलिसांनी सुनीताचा मोबाईल फोन, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि पासपोर्ट जप्त केला आहे, जे तिने पाकिस्तानात नेल्याचा आरोप आहे. तिच्या फोनच्या डिजिटल विश्लेषणातून एका पाकिस्तानमधील एका धर्मगुरूशी सतत संवाद असल्याचे उघड झाले आहे.
झोन 5 चे पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांनी या घडामोडींना दुजोरा दिला आणि सांगितले की, सुनीताच्या बेकायदेशीर सीमा ओलांडण्यामागील हेतू शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
मुलगा सध्या सीडब्ल्यूसीच्या देखरेखीखाली
सुनीतानी तिच्या सुरुवातीच्या जबाबात दावा केला आहे की, ती तिच्या 12 वर्षांच्या मुलाला बर्फ दाखवण्यासाठी कारगिलला गेली होती. प्रवासादरम्यान त्यांचे पैसे संपले आणि काम शोधू लागली, ज्यामुळे त्यांना नियंत्रण रेषा ओलांडावी लागली. तिचा मुलगा सध्या कारगिलमधील बाल कल्याण समिती (सीडब्ल्यूसी) च्या देखरेखीखाली आहे.