जेएनएन, पनवेल. वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagwane Case) प्रकरण ताजे असतानाच पनवेल मधील पेठाली गावातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. पेठाली गावातील सोनम केणी या तरुणीला घर बांधकामासाठी 20 लाख रुपये आणि मुलगा हवा म्हणून सासरी अतोनात छळ करण्यात आलाय. सासरच्या छळाला कंटाळून अखेर सोनमने आपल्याच वाढदिवशी आपल्या पोटच्या मुलीची हत्या करुन स्वतःदेखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सासरच्यांची पैशाची मागणी 

2018 साली पनवेल मधील पेणधर गावातील सोनम पाटील हिचा पेठाली गावातील अभिषेक केणी याच्यासोबत विवाह झाला होता. 2020 साली त्यांना पहिली मुलगी झाल्यानंतर दुसरा मुलगाच व्हावा यासाठी अंधश्रद्धा पाळत भगत, भोंदू बाबा, डॉक्टरची ट्रीटमेंट करत दबाव टाकण्यात आला. मात्र 2024 साली दुसरी देखील मुलगी झाल्याने सासरच्यांनी टोमणे मारत छळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान पैशाची मागणी देखील करण्यात आली. 

मुलीची हत्या करुन स्वतः केली आत्महत्या 

दुसऱ्या मुलीचा दोनच महिन्यात पाळण्यातच संशयास्पद मृत्यू देखील झाला. यामुळे सोनमला प्रचंड मानसिक धक्का बसला असताना देखील सासरच्यांनी लगेचच पुन्हा बाळासाठी प्रयत्न करण्यासाठी दबाव टाकला. सासूला मुलगी नको होती अशी तक्रार देखील सोनमने आपल्या बहिणीकडे केली होती. वारंवार पैशाची मागणी, टोमणे मारत मानसिक छळ याला कंटाळून अखेर आपल्या वाढदिवशीच सोनमने आपल्या पाच वर्षीय मुलीची हत्या करुन स्वतः देखील आत्महत्या केली.

आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप 

    यावेळी सोनमने 8 पानांची सुसाईड नोट देखील लिहिली होती. ज्यात सासरच्यांकडून होणाऱ्या छळाचा उल्लेख करण्यात आलाय. त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप सोनमच्या कुटुंबियांनी केला आहे.

    महिनाभरांपासून नवरा आणि सासू फरार

    याप्रकरणी नवरा अभिषेक केणी सासू प्रभावती आणि चार नणंदान विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र महिना उलटूनही अद्यापही नवरा आणि सासू फरार असून याप्रकरणी पोलिसांनी कोणतीही अटक किंवा कारवाई केली नसल्याचा गंभीर आरोप सोनमच्या कुटुंबियांनी केला आहे. तर आरोपी पती आणि सासू जामीन मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागत असल्याची माहिती समोर आली आहे. आमच्या मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असून ही आत्महत्या नसून हत्या आहे, असा आरोप करत आम्हाला न्याय द्या अशी मागणी सोनमच्या कुटुंबियांनी केली आहे.