जेएनएन, मुंबई. मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये घरगुती एलपीजी गॅसच्या संभाव्य तुटवड्याच्या भीतीमुळे नागरिक घाबरले आहे. गॅस सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक नागरिक पहाटेपासूनच गॅस एजन्सीबाहेर रांगेत उभे राहत असल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

बुकिंग करूनही वेळेवर सिलेंडर घरपोच मिळत नसल्याने

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गॅस पुरवठा कमी होत असल्याची माहिती पसरल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. परिणामी अनेकांनी एकाच वेळी गॅस सिलेंडर बुकिंग करण्यास सुरुवात केली. मात्र ऑनलाइन बुकिंग करूनही वेळेवर सिलेंडर घरपोच मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.

खुल्या मैदानात नागरिक रांगेत उभे 

या संदर्भात माहिती घेण्यासाठी काही नागरिकांनी गॅस एजन्सीचा संपर्क साधला असता, त्यांना थेट एजन्सीसमोर रांगेत उभे राहून सिलेंडर घेण्याचा सल्ला देण्यात आल्याचे समोर आले आहे. सध्या घरपोच वितरण करणे कठीण होत असल्याने एजन्सीकडून खुल्या मैदानात नागरिकांना रांगेत उभे करून सिलेंडरचे वितरण केले जात आहे. 

नागरिक पहाटे पाच वाजल्यापासूनच रांगेत उभे

    नागरिक पहाटे पाच वाजल्यापासूनच रांगेत उभे राहत असून सकाळी दहा वाजता एजन्सी सुरू झाल्यानंतर सिलेंडरचे वाटप सुरू होते. मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने अनेकांना पाच ते सहा तास रांगेत थांबल्यानंतरच सिलेंडर मिळत असल्याचे दिसून येत आहे.

    गॅसचा पुरवठा कमी होईल या भीतीने अनेकजण

    दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या इराण –इस्राईल युद्ध आणि त्यात अमेरिकेच्या संभाव्य सहभागामुळे ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. त्यामुळेच गॅसचा पुरवठा कमी होईल या भीतीने अनेकजण आगाऊ सिलेंडर घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

    नागरिकांमध्ये संभ्रम 

    या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने गॅस पुरवठ्याबाबत स्पष्ट माहिती देत परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.