रायगड.  रायगड जिल्ह्यातील चविष्ट आणि रसाळ कलिंगडांना राज्यासह परदेशातही मोठी मागणी असते. यामध्ये गोरेगाव, माणगाव आणि कोलाड परिसरात पिकणारी कलिंगडे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर आखाती देशांमध्ये निर्यात केली जातात. मात्र यंदा आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे कलिंगड निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. याचा मोठा आर्थिक फटका रायगडमधील कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.

दरवर्षी या भागातून हजारो टन कलिंगडे दुबई, मस्कत, कुवेत आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये पाठवली जातात. निर्यातीमुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळत असल्याने अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणावर कलिंगड लागवड करतात. मात्र यंदा आखाती भागात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे आणि वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाल्याने निर्यात प्रक्रिया थांबली आहे. परिणामी तयार झालेला शेतमाल परदेशात पाठवता आलेला नाही.

निर्यात बंद पडल्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. शेतात तयार झालेली कलिंगडे वेळेत विकली न गेल्याने ती सुकून आणि कुजून जात आहेत. काही शेतकऱ्यांनी काढलेली फळे स्थानिक बाजारात विक्रीसाठी आणली असली तरी त्यांना केवळ पाच ते सात रुपये किलो इतकाच दर मिळत आहे. हा दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

कलिंगड लागवडीसाठी बियाणे, खते, औषधे, पाणीपुरवठा तसेच मजुरी यावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला होता. मात्र बाजारात योग्य दर न मिळाल्याने हा खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

दरम्यान, शेतकऱ्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने याकडे लक्ष देऊन निर्यातीसाठी पर्यायी व्यवस्था करावी किंवा शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा रायगडमधील कलिंगड उत्पादकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.