जेएनएन, मुंबई: इयत्ता 12 वीची परीक्षा आजपासून सुरू झाली आहे. राज्यात सर्वत्र विद्यार्थांमध्ये उत्साह दिसून येत आहे. बारावीचा पहिला पेपर असल्यांनं प्रशासनानंही तगडा बंदोबस्त केला आहे. कॉपीमुक्त परीक्षा अभियानानंतर सर्व केंद्रावर पथकांमार्फत नजर ठेवली जात आहे. तर काही ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेरांच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे. 

ड्रोनच्या साहाय्याने परीक्षा केंद्रांवर लक्ष 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 12 वीचे मुख्य केंद्र असलेल्या कुडाळ हायस्कूल येथे आज बारावीच्या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 23 केंद्रांवर ही परीक्षा होत असून, एकूण 8 हजार 487 विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत. राज्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत असून, त्या दृष्टीने ड्रोनच्या साहाय्याने परीक्षा केंद्रांवर लक्ष राहणार आहे, अशी माहिती  केंद्रप्रमुख प्रवीण भोगटे यांनी दिली आहे. 

परीक्षार्थींवर राहणार सीसीटीव्हीचा वॉच!

राज्यभरामध्ये बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली असून, या परीक्षेमध्ये पारदर्शकता असावी आणि अनुचित प्रकार घडू नये यासाठी महाविद्यालय प्रशासन तसेच बोर्डाने विशेष लक्ष दिले आहे. छत्रपती संभाजी नगर शहरासह जिल्ह्यामध्ये परीक्षेला सुरुवात झाली आहे, परीक्षेतील अनुचित प्रकार टाळण्यासाठी विशेष असे प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या प्राचार्य सीमा सिद्दिकी यांनी दिली आहे.

    केंद्राबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त

    यवतमाळमध्येही माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील 126 केंद्रावर 33 हजार विद्यार्थी परीक्षेला बसले असून, 23 संवेदनशील केंद्रावर ड्रोनचा वॉच राहणार आहे. आज 11 ते 2 या वेळेत इंग्रजी भाषेचा पेपर असून, कॉपीमुक्त वातावरणात ही परीक्षा पार पडावी म्हणून केंद्राबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भरारी पथक तसेच बैठे पथकांचाही वॉच राहणार आहे, अशी माहिती विद्यालय पर्यवेक्षक प्रवीण प्रजापति यांनी दिली आहे.

    प्रत्येक परीक्षा केंद्रावर कॅमेऱ्याने नजर 

    आज इंग्रजीचा पहिला पेपर आहे. नंदुरबार जिल्ह्यात 12 वीच्या परीक्षांसाठी 28 केंद्र असून ज्या केंद्रावर 12 वीचे पेपर होणार आहे तेथे पूर्वतयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यात कॉपी मुक्त अभियानासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर कॅमेऱ्याने नजर ठेवण्यात येणार आहे तसेच परीक्षा केंद्रा जवळ ड्रोन कॅमेराद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे.

    केंद्रावर बैठे पथक तैनात 

    गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रत्येक ब्लॉक मध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे तसेच नियंत्रण कक्षा मधून प्रत्येक ब्लॉकवर झूम अँप द्वारे लक्ष राहणार आहे. या परीक्षा केंद्रासाठी 6 भरारी पथक नेमण्यात आली असून प्रत्येक केंद्रावर बैठे पथक देखील तैनात राहणार आहे. कॉपीमुक्त अभियानासाठी पोलीस प्रशासन व इतर विभागाचे देखील मदत घेण्यात येणार आहे. 12 वीच्या परीक्षेसाठी नंदुरबार जिल्ह्यात जवळपास 17 हजार  विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा भय मुक्त वातावरणात व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण तयारी केली केली असल्याची माहिती शिक्षणाधिकारी संतोष अहिरे यांनी दिली.

    असे करा 10 वी, 12 वीचे वेळापत्रक डाऊनलोड (12 Exam Time Table)

    महाराष्ट्र बोर्ड एचएससी आणि एसएससी परीक्षांचे वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांना सर्वप्रथम mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. येथे होमपेजवर उपलब्ध असलेल्या 10 वी आणि 12 वीच्या वेळापत्रकाच्या लिंकवर क्लिक करा. तुमच्यासमोर वेळापत्रकाची पीडीएफ उघडेल. ते डाउनलोड करा आणि परीक्षेसाठी जतन करा आणि परीक्षेला जा.