जेएनएन, सांगली. सांगली जिल्ह्यातील जत येथे एका 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. अत्याचार करणाऱ्या नराधमाला काही तासांत अटक करून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेनं संपूर्ण सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर आता महिला आयोगानं आदेश दिला आहे.
दोषींना लवकरच शिक्षा दिली जाणार
15 दिवसांत दोषारोपपत्र सादर करावे असे निर्देश महाराष्ट्र महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत. तसंच, हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून दोषींना लवकरच शिक्षा दिली जाणार आहे, असं आश्वासन चाकणकर यांनी दिलं आहे.
आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पाठपुरवठा करणार
कोल्हापूर मधील खोची असेल, मावळ मधील कोथुर्णे असेल किंवा वेल्हा मधील कातकरी समाजातील असेल, या तिन्ही घटनातील आरोपींना फाशीच्या शिक्षेसाठी राज्य महिला आयोगाने पाठपुरावा केला आहे. या तिन्ही घटनेतील आरोपींना न्यायालयाने फाशी सुनावली होती. या घटनेतील नराधम आरोपीला देखील फाशीची शिक्षा होईल यासाठी आयोग पाठपुरावा करणार आहे अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.
पिडीत कुटुंबाला मदत
पिडीत संबंधित कुटुंबियांना तातडीने मनोधैर्य योजना व मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत देण्यात येणार आहे, अशी माहितीही चाकणकर यांनी दिली आहे.
खाऊचे आमिष दाखवून शेडमध्ये नेलं अन्
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन, करजगी येथे चार वर्षांची चिमुरडी मुलगी आजी- आजोबा सोबत राहत होती, तर तिचे आई-वडील मोलमजुरी करण्यासाठी रत्नागिरी येथे कामाला आहेत. घराशेजारीच पांडुरंग कळ्ळी हा आईसह राहत होता. तो मजुरी करत होता. त्याच्या घरासमोरच मुलगी खेळत होती. तेव्हा त्याने तिला खाऊ देऊन तिच्याशी खेळत असल्याचे भासवले. त्यानंतर पत्रा शेडमध्ये नेऊन पांडुरंगने तिच्यावर बलात्कार करून खून केला. खुनानंतर कोणाला प्रकार निदर्शनास येऊ नये म्हणून तिला पोत्यात टाकून मृतदेह लोखंडी पेटीत लपवला होता.