जेएनएन, मुंबई. Maratha Reservation Agitation Impact : मराठ्यांना ओबीसी कोट्यातून १० टक्के आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषण आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून लोकांच्या गर्दीमुळे आज (सोमवार) सकाळपासून लोकल सेवेवर परिणाम झाला आहे.
रेल्वे स्टेशनवर गोंधळाचे वातावरण -
आंदोलक रेल्वे रुळांवर उतरल्याने अनेक गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना लोकल गाड्यांमधून प्रवास करताना चढण्यात व उतरण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्या फलाटावर गाड्या थांबत आहेत, तिथे प्रचंड गर्दी झाल्याने ढकलाढकलीचे प्रसंगही घडत आहेत.
प्रवाशांकडून संताप -
कार्यालयीन वेळेत प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना वेळेवर ऑफिसला पोहोचणे कठीण झाले आहे. महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. प्रवाशांनी प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. विकेंड आणि गणपती सुट्टीमुळे या आंदोलनाचा सर्वसामान्य मुंबईकरांवर मोठा परिणाम झाला नाही. मात्र आज सोमवारी कामकाजाचा दिवस असल्याने परिस्थिती चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मराठा बांधवांचा आक्रमक पवित्रा -
मराठा समाजानी रेल्वे वाहतूक थांबवत घोषणाबाजी सुरू केली आहे. आरक्षण आमचा हक्क आहे, असा नारा देत आंदोलन करत आहे. पोलिसांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही.
हे ही वाचा -Maratha Quota Protest : आज मुंबईत होणार चक्का जाम? मराठा आंदोलकांचा रेल रोको आंदोलनाचा इशारा
मुंबईकरांवरील परिणाम -
लोकल गाड्या वेळापत्रकापेक्षा उशिरा धावत असल्याने प्रवास विस्कळीत झाला आहे. ठाणे, दादर, कल्याण, कुर्ला आणि सीएसएमटीसारख्या गर्दीच्या स्थानकांवर मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. रस्ते वाहतूकही विस्कळीत होण्याची शक्यता असून, पर्यायी वाहतुकीवर अतिरिक्त भार पडत आहे. राज्यातून हजारो गाड्या मुंबईत दाखल झाल्याने रस्ते जाम झाले आहेत.