जेएनएन, मुंबई. Maratha Quota Protest : आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला राज्य सरकारकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आजपासून आंदोलन आणखी आक्रमक होणार आहे. मुंबईचा चक्का जाम होणार आहे. रेल्वे वाहतूक ठप्प करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. या आंदोलनाचा मुंबईकरांना मोठा फटका बसू शकतो.
आझाद मैदानात आंदोलन -
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीन दिवसांपासून आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू आहे. विकेंड आणि गणपती सुट्टीमुळे या आंदोलनाचा सर्वसामान्य मुंबईकरांवर मोठा परिणाम झाला नाही. मात्र आज सोमवारी कामकाजाचा दिवस असल्याने परिस्थिती चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रेलरोको आंदोलनाचा इशारा -
मराठा समाजाच्या आंदोलकांनी मुंबईतील काही महत्त्वाच्या स्थानकांवर रेलरोको करण्याची रणनीती आखली आहे. यामध्ये सीएसएमटी, दादर, ठाणे, कुर्ला, कल्याण या महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश असणार आहे. यामुळे आज मुंबईचा चक्का जाम होणार आहे.
लोकल सेवांवर होणार परिणाम?
लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाल्यास मुंबईकरांना मोठा फटका बसेल. कामकाजाचा आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने कार्यालयात जाणाऱ्या लाखो प्रवाशांचे हाल होणार आहे. रस्त्यांवर वाहतुकीची समस्या निर्माण झाली असून अनेक तास वाहन ट्रॅफिक जाममध्ये अडकत आहेत.