मुंबई/नाशिक Manikrao Kokate news : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्य सरकारमधील मंत्री माणिकराव कोकाटे यांना सदनिका (फ्लॅट) गैरव्यवहार प्रकरणात मोठा धक्का बसला आहे. संबंधित प्रकरणात त्यांना सुनावलेली २ वर्षांची शिक्षा न्यायालयाने कायम ठेवली आहे. या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, विरोधकांकडून माणिकराव कोकाटेंच्या तात्काळ राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात आहे.

काय आहे प्रकरण?

माणिकराव कोकाटे यांच्यावर सदनिका मिळवताना उत्पन्नाबाबत चुकीची माहिती दिल्याचा आरोप होता. या प्रकरणात कनिष्ट न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत २ वर्षांची शिक्षा आणि दंड ठोठावला होता. या शिक्षेविरोधात कोकाटे यांनी अपील दाखल केले होते. मात्र, न्यायालयाने अपील फेटाळत मूळ शिक्षा कायम ठेवली आहे.

न्यायालयाचा निर्णय-

न्यायालयाने दिलेल्या निकालात, आरोपींकडून नियमांचा भंग झाल्याचे स्पष्ट होत असल्याचे नमूद केले आहे. तसेच, सार्वजनिक पदावर असलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारची अपेक्षा करता येत नाही, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले असल्याची माहिती आहे.

राजकीय पडसाद-

    या निकालानंतर विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीला दोषी ठरवून शिक्षा कायम ठेवली गेली असताना त्यांनी पदावर राहणे नैतिकदृष्ट्या अयोग्य असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटेंनी मंत्रीपदाचा तसेच आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

    राष्ट्रवादीची भूमिका?

    या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत प्रतिक्रिया आली नाही . पक्षाची पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निकालानंतर वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचीही माहिती आहे.

    कोकाटे मंत्रीपदाची राजीनामा देणार?

    या निर्णयाचा परिणाम माणिकराव कोकाटेंच्या मंत्रीपदावर आणि आमदारकीवर होण्याची शक्यता आहे. तसेच, कायदेशीर मार्गाने पुढील अपील किंवा स्थगिती मिळते का, यावरही त्यांच्या राजकीय भवितव्याचे गणित अवलंबून असणार आहे.