जेएनएन, तुळजापूर. शहरात काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये रस्त्याच्या कामावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट हिंसाचारात झाले. काही दिवसांपूर्वी रस्त्याच्या कामावरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. स्थानिक पातळीवर मध्यस्थी करून तो वाद मिटवण्यात आला होता. मात्र हा वाद पुन्हा एकदा चिघळत गंभीर स्वरूप धारण केल्याची माहिती समोर आली आहे.
मगर-गंगणे गटात राडा -
प्राथमिक माहितीनुसार, महाविकास आघाडीचे उमेदवार अमर मगर यांच्या नातेवाईकावर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात कुलदीप मगर हे जखमी झाले असून, भाजपशी संबंधित पिटू गंगेनेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. हल्ल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. इतक्यावरच ही घटना थांबली नाही. तर मगर यांच्या घराबाहेर जमावाने हवेत गोळीबार केल्याचीही प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. अचानक झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले.नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले आणि काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जमाव पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली. हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे.
पोलीस बंदोबस्तात वाढ -
दरम्यान, या घटनेनंतर तुळजापूरमध्ये पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संवेदनशील भागात अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या प्रकरणी संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, हल्ला आणि गोळीबाराच्या घटनेचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
