पुणे- pune land deal case : पुण्यातील बहुचर्चित जमीन गैरव्यवहार प्रकरणात महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणारी माहिती समोर आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात पार्थ पवारांचा  Parth Pawar) थेट सहभाग नसल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने करण्यात येत होता. मात्र आता आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी समोर आणलेल्या एका पत्रामुळे या दाव्यांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विजय कुंभार यांनी उघड केलेल्या माहितीनुसार, 1 जून 2021 रोजी पार्थ पवार यांनी स्वतः एक पत्र लिहिले असून ते पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आले आहे. या पत्रात कोरेगाव पार्क परिसरातील वतनाची जमीन मूळ वारसदारांच्या नावे हस्तांतरित करावी, अशी स्पष्ट मागणी करण्यात आल्याचा दावा कुंभार यांनी केला आहे. विशेष म्हणजे, ही जमीन वादग्रस्त असून याच प्रकरणाला पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण म्हणून ओळखले जाते.

आतापर्यंत या प्रकरणात पार्थ पवारांशी संबंधित कंपनीचा सहभाग असल्याचे आरोप केले जात होते. मात्र खुद्द पार्थ पवार यांनीच प्रशासकीय पातळीवर जमीन मिळवण्यासाठी पाठपुरावा केल्याचा पुरावा आता समोर आल्याने हे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे, असा आरोप विजय कुंभार यांनी केला आहे. ही केवळ कंपनीची बाब नाही, तर पार्थ पवार यांचा वैयक्तिक हस्तक्षेप असल्याचे या पत्रावरून स्पष्ट होते, असा दावा कुंभार यांनी केला.

या पत्रामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. जर पार्थ पवारांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नव्हता, तर त्यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिण्याची गरज का भासली? तसेच, वतनाच्या जमिनीबाबत नियम आणि कायदेशीर प्रक्रिया माहिती असताना असा पाठपुरावा कोणत्या हेतूने करण्यात आला, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र विरोधकांनी या मुद्द्यावरून राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. हा प्रकार म्हणजे सत्तेचा गैरवापर असून संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षांकडून होत आहे.

पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांच्या कथित पत्रामुळे राजकीय तापमान चढले असून, येत्या काळात या मुद्द्यावरून राज्याच्या राजकारणात मोठे वादळ उठण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.