जेएनएन, मुंबई. Maharashtra Rains Update: राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. तर अनेक नद्या इशारा पातळीवरुन वाहत आहेत. जगबुडी नदीही इशारा पातळीवरुन वाहत आहे. आज राज्यातील सर्व जिल्ह्यात पावसांचा अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईत रेड अलर्ट 

भारतीय हवामान खात्याने (IMD) आज सकाळी 10 वाजता दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरात पुढील तीन ते चार तासांसाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर, सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की योग्य ती काळजी घ्यावी. आवश्यकता नसेल तर कृपया घराबाहेर पडणे टाळावे, असं आवाहन हे बीएमसीनेही केले आहे.

तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट

  • रेड अलर्ट  (Red Alert in Maharashtra) 

ठाणे, मुंबई, रायगड, रत्तागिरी, पुणे घाट, कोल्हापूर घाट, सातारा घाट, 

    • ऑरेंज (Orange Alert in Maharashtra)

    सिंधुदुर्ग, पालघर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, अमरावती, 

    • येलो (Yellow Alert in Maharashtra)

    धुळे, नंदुरबार, नाशिक, नाशिक घाट, पुणे, अहिल्यानगर, सातारा, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, धाराशीव, अकोला,  भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ,

    पुढील चार दिवसांचा पावसाचा अंदाज (IMD नुसार)

    सर्वाधिक पाऊस झालेले जिल्हे (मागील 24 तासात):

    • रत्नागिरी: 128.9 मिमी
    • सिंधुदुर्ग: 101 मिमी
    • मुंबई उपनगर: 99.4 मिमी
    • रायगड: 43.5 मिमी
    • मुंबई शहर: 38.4 मिमी 

    या जिल्ह्यात रेड अलर्ट

    पुढील 24 तासासाठी मुंबई, रायगड, पुणे घाट, सातारा घाट, रत्नागिरी, कोल्हापूर घाट या भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, जळगाव, छ. संभाजीनगर, जालना, बीड, लातुर, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

    समुद्र खवळलेल्या स्थितीत

    INCOIS तर्फे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी या जिल्ह्यांना आज सायंकाळी साडे अकरा ते 20 ऑगस्ट साडे दहापर्यंत 3.5 ते 4.3 मीटर तसेच पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना उद्या सकाळी साडे आठ वाजतापासून 20 ऑगस्ट साडे दहापर्यंत  3.5 ते 4.2 मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. समुद्राची स्थिती खवळलेली व ताशी 50-60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समुद्राची धूप आणि उंच लाटांचे तडाखे समुद्र किनारी येण्याचा इशारा देण्यात आला आहे. सर्व जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

    जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी

    रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी, शास्त्री, कोदवली या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे तसेच रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून जिल्हा प्रशासना मार्फत सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली आहे.  

    NDRF चे 1 पथक बीडमधील परळी कौडगाव येथे शोध व बचाव कार्यासाठी नियुक्त करण्याच्या अनुषंगाने रवाना करण्यात आले आहे. SDRF चे 1 पथक नांदेड तालुका मुखेड हळणी गाव येथे नियुक्त केले असून त्या परिसरात कार्यरत आहे.

    मागील 24 तासांतील महत्त्वाच्या घटना  

    मनुष्य आणि प्राण्यांची जीवितहानी:

    • नांदेड जिल्ह्यात वीज पडून 1 व्यक्तीचा मृत्यू आणि 1 व्यक्ती जखमी.
    • धुळे जिल्ह्यात वीज पडून 2 व्यक्ती जखमी.
    • अकोला जिल्ह्यात भिंत पडून 1 जनावराचा मृत्यू

    हेही वाचा - Mumbai Rains: मुंबईत मुसळधार पाऊस सुरु, शाळा -महाविद्यालयांना सुट्टी जाहीर