जेएनएन, मुंबई. Maharashtra Weather Update Today: राज्यात अवकाळी पावसानंतर मान्सून परतला आहे. राज्यात कालपासून मान्सून सक्रिय झाला आहे. मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. यामुळे काही भागांसाठी हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. येत्या काही तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने  वर्तवली आहे. विदर्भाला सुद्धा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

विदर्भात कोरडे वातावरण

राज्यात मान्सून दाखल झाला असून विदर्भातील काही जिल्हात पावसाचा जोर वाढतांना दिसत नाही. पश्चिम विदर्भात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला असून पूर्व विदर्भात हलक्या पावसाची नोंद झाली आहे. पुढील 24 तासांत ही परिस्थिती बदलणार आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. 

कोकण-पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस

मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये यलो आणि ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे. यामुळे या भागात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात मान्सून सक्रिय झाला असून 20  जूनपर्यंत अधिक जोर वाढणार असल्याची माहीती हवामान विभागाने दिली आहे.

    16 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा!

    महाराष्ट्रसहीत कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश, राजस्थान, बिहारसह एकूण 16 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.