जेएनएन, मुंबई. Mumbai Weather Update: भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार, पुढील 24 तासाकरीता रायगड जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट भागात पावसाचा रेड अलर्ट (Red Alert in Maharashtra) देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात मागील 24 तासांमध्ये (16 जून 2025 रोजी सकाळपर्यंत) रत्नागिरी जिल्ह्यात 112.7 मिमी पाऊस झाला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 110.7 मिमी, मुंबई शहर 100.4 मिमी, मुंबई उपनगर 86 मिमी, रायगड 72.1 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
कोणत्या भागात किती झाला पाऊस
राज्यात कालपासून आज 16 जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे 65.6, रायगड 72.1, रत्नागिरी 112.7, सिंधुदुर्ग 110.7, पालघर 33.8, नाशिक 5.3, धुळे 6.9, नंदुरबार 2.4, जळगाव 5.9, अहिल्यानगर 1.5, पुणे 22.1, सोलापूर 0.8, सातारा 17.1, सांगली 16.6, कोल्हापूर 51.4, छत्रपती संभाजीनगर 11, जालना 3.5, बीड 0.7, लातूर 0.7, धाराशिव 1, नांदेड 0.2, परभणी 0.3, बुलढाणा 5.1, अकोला 7.4, अमरावती 7.4, यवतमाळ 0.1, वर्धा 0.5, नागपूर 0.4, गोंदिया 4.
अनेक नद्यांनी ओलांडली इशारा पातळी
रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी, शास्त्री आणि कोदवळी या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. जिल्हा प्रशासनामार्फत नदी पात्रातील नागरिकांना सतर्क राहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफ पथकांना आपत्कालीन परिस्थितीकरिता सतर्क राहण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
विविध घटनेत अनेकांचा मृत्यू
अहिल्यानगर जिल्ह्यात रस्ते अपघातात तीन व्यक्तींचा मृत्यू तर सात व्यक्ती जखमी झाले असून नाल्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात वीज पडून दोन तर जालना जिल्ह्यात तीन प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. जळगाव जिल्ह्यात वीज पडून तीन व्यक्तींचा मृत्यू व एक व्यक्ती जखमी झाला आहे तर भिंत पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ठाणे जिल्ह्यात दरीत पडून एका व्यक्तीचा मृत्यू तर आगीच्या घटनेत एक व्यक्ती जखमी झाली आहे.
रायगड जिल्ह्यात पाण्यात बुडून तीन व्यक्तींचा मृत्यू, मुंबई उपनगर जिल्ह्यात झाड पडून एक व्यक्ती जखमी, बुलढाणा जिल्ह्यात पाण्यात बुडून दोन व्यक्तींचा मृत्यू आणि चार व्यक्ती जखमी तर धुळे जिल्ह्यात वीज पडून एक व्यक्ती जखमी झाला आहे. पुणे येथील मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शेजारी कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल दुर्घटनेत चार व्यक्तींचा मृत्यू आणि 51 व्यक्ती जखमी झाल्या आहेत, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.