जेएनएन, मुंबई. Maharashtra Monsoon Session 2025 Latest News: विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. शेतकरी विषयावर विरोधकांनी सभात्याग केला आहे. शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा करा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या सरकारचा धिक्कार करत विरोधकांनी सभात्याग केला आहे. तसंच, विरोधकांनी आज पूर्ण दिवस कामकाजावर बहिष्कार टाकला आहे.
सभागृहात गोंधळ
‘कृषी मंत्री कोकाटे आणि आमदार लोणीकर हे शेतकऱ्यांचा अवमान करतात, तात्काळ मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी’, अशी मागणी करत काँग्रेस आमदार नाना पटोले यांचा जोरदार आक्षेप घेतला. त्यानंतर शिवसेना आमदार भास्करराव जाधव, काँग्रेस आमदार विजय वड्डेटीवार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यासह विरोधी आमदारांनी मुख्यमंत्र्यांनी माफी मागवी, या मागणीसाठी सभागृहात गोंधळ घातला.
यानंतर, मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी या मागणीसाठी नाना पटोले आणि वडेट्टीवार यांनी अध्यक्षांच्या आसनाला घेराव घातला. सगळे विरोधक हे दालनात उतरले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचे कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
पूर्ण दिवसाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग
कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर विरोधकांनी माफी मागा म्हणून घोषणाबाजी केली. त्यावेळी विधानसभा अध्यक्ष यांनी नाना पटोले यांच्यावर एक दिवसाच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली. महाविकास आघाडीच्या नेत्यांना सभागृहात बोलूच दिले जात नाही, उलट शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलल्यावर कारवाई करण्यात येते यावर महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. विरोधकांनी पूर्ण दिवसाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला.
नाना पटोले निलंबित
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काँग्रेस आमदार नाना पटोले यांना दिवसभरासाठी निलंबित केले.