जेएनएन, मुंबई. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session 2026) सध्या सुरू आहे. आज (6 मार्च) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात अर्थसंकल्प (Budget) सादर केला. त्यांनी राज्यातील विविध शहरांतील मेट्रो प्रकल्पाबाबत घोषणा केली आहे.
राज्यात सन 2047 पर्यंत प्रवासी व माल वाहतुकीकरिता सलग संपर्क जाळे निर्माण करण्यासाठी 1 हजार 200 किलोमीटर लांबीचे मेट्रोमार्ग तसेच 6 हजार किलोमीटरपेक्षा जास्त द्रुतगती मार्ग विकसित करण्याचे नियोजन आहे.
मेट्रो मार्ग
- मुंबई, पुणे व नागपूर शहरांमध्ये एकूण 490 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असून त्यापैकी 173 किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. तसेच आगामी वर्षात 50 किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्याचे नियोजन आहे. सन 2029 पर्यंत आणखी 165 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका सुरू करण्यात येणार आहेत.
- वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया, मुंबई मेट्रो मार्गिका-11 हा 23 हजार 487 कोटी रुपये किमतीचा पूर्णतः भूमिगत प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचा विस्तार धारावी पुनर्वसन प्रकल्पातून पुढे वांद्रे उपनगरीय स्थानक व वांद्रे टर्मिनस पर्यंत करण्याचे नियोजन आहे.
- मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ यांना जोडणारा मुंबई मेट्रो मार्ग-8 हा 22 हजार 862 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे.
- तळोजा ते खांदेश्वर नवी मुंबई मेट्रो मार्ग-2 या 5 हजार 575 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पामुळे नवी मुंबई विमानतळापर्यंत वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होईल.
हेही वाचा - Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींसाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा; 20000 कोटी रुपये निधी..
हेही वाचा - Maharashtra Budget: लागा तयारीला! राज्यात 75000 पदांवर होणार भरती, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा
