जेएनएन, मुंबई: राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या व थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचनांसाठी 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत राज्य निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे.

8 ऑक्टोबर प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध

नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावर आता 13 ऑक्टोबरऐवजी 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी 28 ऑक्टोबरऐवजी 31 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची घोषणा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपरिषदांमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची घोषणा केली. मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत हे आरक्षण जाहीर झाले.

हेही वाचा - Local Body Election: राज्यातील नगरपालिका, नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर; पाहा संपूर्ण लिस्ट

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार?

    महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Election) गेल्या चार ते पाच वर्षांपासून विविध कारणांमुळे लांबणीवर पडल्या आहेत. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तसेच इतर अनेक कारणांमुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मुदतवाढीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडे अर्ज दाखल केला होता. त्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्यासाठी 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ (Local Body Election Date) मंजूर केली आहे. म्हणजेच, आता महाराष्ट्रात जानेवारी अखेरपर्यंत निवडणूक होणार आहे.