जेएनएन, मुंबई. Ladki Bahin Yojana April Installment: महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी महिलांच्या थेट बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करण्यात येतात. आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात एकूण 9 महिन्यांचे हप्ते जमा झाले आहेत. आता पुढील महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

10 वा हप्ता एप्रिल महिन्यात मिळणार 

लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत एकूण नऊ हप्त्यांचे एकूण 13,500 रुपये (जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च) लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. आता 10 वा हप्ता एप्रिल महिन्यात मिळणार आहे. लाडकी बहीण योजना ही महिलांना आर्थिक प्रोत्साहन आणि त्यांच्या सक्षिमीकरणासाठी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात सुरु करण्यात आली होती. ही केवळ आर्थिक मदत नाही, तर अनेकांच्या जगण्याचा आधार आहे, अशी प्रतिक्रिया काही महिलांनी दिली आहे.

लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा 

महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासोबतच त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करून कुटुंबातील महिलांची निर्णायक भूमिका अधिक बळकट करण्याचा लाडकी बहीण योजनेचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत अडीच कोटींहून अधिक महिलांना थेट लाभ मिळत आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारी-मार्च महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला होता.

    एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार?

    फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येपासून देण्यात आला होता. आता एप्रिल महिन्याचा लाभ रामनवमीच्या मुहूर्तावर दिला जाण्याची शक्यता आहे. यंदा 6 एप्रिल रोजी श्रीराम नवमी आहे. त्यामुळे 5 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीत पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' बंद होणार?

    लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचं सातत्याने विरोधकांकडून बोलण्यात येत आहे. यावर विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्टता दिली.  'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' बंद होणार नसल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. लाडक्या बहिणींनी दिलेल्या भक्कम पाठिंब्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.  महिलांच्या सशक्तीकरणासाठी महिलांचे कल्याण आणि विकास हेच राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य राहील, असे फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.