जेएनएन, मुंबई. Maharashtra ST Bus Latest News: उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत दरवर्षीप्रमाणे जादा वाहतूक करण्यात येणार आहे. यंदा देखील उन्हाळी जादा वाहतूकीसाठी दररोज लांब पल्ल्याच्या 764 फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून या सर्व फेऱ्या आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
दोन महिने व्यतिरिक्त जादा वाहतूक
दर वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत येणाऱ्या 15 एप्रिल ते 15 जून पर्यंत एसटी मार्फत नियोजित फेऱ्या व्यतिरिक्त जादा वाहतूक केली जाते. स्थानिक पातळीवर शटल सेवा आणि जवळच्या फेऱ्या संबंधित आगारातून चालवल्या जातात. परंतु उन्हाळी सुट्टीमुळे परगावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी लांब पल्ल्याच्या बसेस ची मागणी वाढते. त्यासाठी या काळामध्ये शालेय फेऱ्या रद्द करून , त्या ऐवजी लांब पल्ल्याच्या फेऱ्या सुरू केल्या जातात.
हेही वाचा - Sai Baba: साईभक्तांसाठी गूडन्यूज, देशभरात साईबाबांच्या मुळ चरण पादुका दर्शनासाठी होणार उपलब्ध
764 जादा फेऱ्यांना मंजूरी
उन्हाळी हंगाम कालावधीत विभागांकडून प्रवाशी गर्दी हेाणाऱ्या मार्गावर 15 एप्रिल पासून जादा फेऱ्या टप्याटप्याने सुरु करण्यात येणार आहेत. उन्हाळी हंगामासाठी एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयमार्फत राज्यातील विविध मार्गावरील 764 जादा फेऱ्यांना मंजूरी देण्यात आली असून, या जादा फेऱ्यांव्दारे दैनंदिन 521 नियतांव्दारे 2.50 लाख किमी चालविण्यात येणार आहे.
हेही वाचा - Maharashtra Budget Session 2025: भारतीय संविधान हे शतकानुशतके देशाला मार्ग दाखविणार - एकनाथ शिंदे
आगाऊ आरक्षण करण्याची सुविधा
उन्हाळी जादा फेऱ्या संगणकीय आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तरी, प्रवाशांच्या सोयीसाठी रा.प.महामंडळाच्या अधिकृत वेबसाईट www.msrtc.maharashtra.gov.in वर तसेच npublic.msrtcors.com या सकेतस्थळावर व मोबाईल ॲपव्दारे या बरोबरच रा.प.महामंडळाच्या बसस्थानकांवरील आरक्षण केंद्रावर आगाऊ आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तरी प्रवाशांना उन्हाळ्याच्या सुट्टीतील प्रवासाचे नियोजन करून महामंडळाच्या मार्फत जादा वाहतूक सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन रा.प.महामंडळाव्दारे करण्यात येत आहे.