जेएनएन, मुंबई. Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ पुढच्या कालावधीमध्येही यशस्वीरित्या राबवण्याचे आणि चालू ठेवण्याची शासनाची भूमिका आहे. पात्र लाभार्थी महिलांवर अन्याय होऊ देणार नाही, लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता देण्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना दिली.

9 लाख महिलांची नावे केली कमी

लाडकी बहीण योजनेत जानेवारीच्या तुलनेमध्ये फेब्रुवारीत लाभार्थींची संख्या घटली आहे. लाडकी बहीण योजनेत डिसेंबर अखेर 2 कोटी 46 लाख महिला लाभार्थी होत्या. त्यातील 5 लाख महिला अपात्र झाल्यानंतर जानेवारी अखेर 2 कोटी 41 लाख लाभार्थी महिला होत्या. या योजनातून आतापर्यंत 9 लाख महिलांची नाव कमी करण्यात आले आहे.

गर्भाशय मुखाच्या कर्करोग लसीकरणाबाबत 

चर्चेदरम्यान मंत्री तटकरे म्हणाल्या की, अंगणवाडी इमारतींच्या दुरुस्तीसाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. अनाथ बालकांच्या पुनर्वसनाबाबत प्रक्रिया सुरळीत करण्याच्या दृष्टिकोनातून नियमानुसार उपाययोजना करण्यात येतील. गर्भाशय मुखाच्या कर्करोग लसीकरणाबाबत आरोग्य विभागासोबत समन्वय साधून उपयुक्त असा उपक्रम पुढच्या कालावधीमध्ये निश्चितपणाने शासन राबविणार आहे.

    11 जिल्ह्यात विविध उपयोजना

    कुपोषणाचे प्रमाण जास्त असलेल्या 11 जिल्ह्यात विविध उपयोजना राबविण्यात येत आहेत. कुपोषण आणि ॲनिमियाचे प्रमाण कमी करण्यासाठी या भागांमध्ये विशेष उपक्रम राबविण्यात येईल. मागणीनुसार व आवश्यकतेप्रमाणे राज्यात स्मार्ट अंगणवाड्यांची निर्मिती करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

    अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधन 5000 रुपयांनी वाढवले

    बाल संगोपन योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत देण्यात येईल. भिक्षेकरी गृहांच्या दुरुस्तीसाठी निधीची उपलब्धता करून देण्यात येईल. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधन 5000 रुपयांनी वाढविण्यात आले आहे. आजपर्यंत ही सर्वात मोठी मानधन वाढ आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असेही तटकरे यांनी सांगितले.