मुंबई. Devendra Fadnavis on Adani Growth: शिवाजी पार्कवर रविवारी झालेल्या सभेत राज ठाकरेंनी भाजपवर घणाघाती टीका करताना अदानी गेल्या 10-12 वर्षात इतका श्रीमंत कसा झाला, असा सवाल उपस्थित केला.  राज ठाकरे म्हणाले की, 2014 मध्ये  देशात मोदी सरकार सत्तेत येण्याच्या आधी गौतम अदानी इतका श्रीमंत नव्हता महाराष्ट्रात तर केवळ एकाच ठिकाणी अदानी होते, मात्र मोदी सत्तेत आल्यानंतर गौतम अदानी यांच्या समूहाने झपाट्याने प्रगती करत देशभरात हातपाय पसरले. भाजपच्या काळात अन्य उद्योगपतींना काहीच फायदा न होता केवळ अदानी समूहालाच महत्त्वाचे प्रकल्प आणि जमिनी देण्यात आला. उद्योजकांनी उद्योगच करू नयेत असा दळभद्री विचार माझा नाही, मात्र केवळ एकाच उद्योजकाला पोसण्याच्या कृतीला माझा विरोध आहे, या राज ठाकरेंच्या आरोपाला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. 

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, मी अदानींचा वकील नाही. राज ठाकरेंच्या टीकेला ते उत्तर देतीलच. मात्र, 2014 नंतर देशात फक्त गौतम अदानीच (Gautam Adani) नव्हे तर अनेक उद्योग समूहांचा विकास झाला, त्यांचे उत्पन्न कैकपटीने वाढले. फडणवीस म्हणाले की, 2014 साली भारताची अर्थव्यवस्था जगात 11 व्या स्थानावर होती आणि आता ती तिसऱ्या क्रमांकावर आहे, आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी उद्योगपतींनी योगदान दिले आहे. पण विरोधकांना आपल्याच भूमिपुत्रांना रोजगार द्यायचा नाही. परंतु, महायुती ही मुंबईमधील तरुणांना रोजगारही देईल आणि त्यांचे भविष्यही उज्ज्वल करेल. त्यासाठी उद्योगपतींना राज्यात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन दिले जाईल. 

अर्थव्यवस्था वाढल्यानंतर देशभरात अनेक नवे उद्योजक तयार झाले. पंतप्रधान मोदी यांच्यामुळे ज्या कंपन्या यापूर्वी भांडवली बाजारात लिस्टेड होऊ शकल्या नव्हत्या, त्या सूचिबद्ध झाल्या. यामुळे प्रत्येकाचे उत्पन्न आणि नफा प्रचंड वाढला, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

फडणवीस यांनी अदानीसोबतच अन्य कंपन्यांच्या नफ्याचा उल्लेख केला. 2014 नंतर टाटा समूहाचे उत्पन्न 664, एचडीएफसी बँकेचे उत्पन्न 377 टक्के, अदानी समूह 686 टक्के, इन्फोसिस 280 टक्के, आदित्य बिर्ला ग्रूप 566 टक्के, भाती ग्रूप 266 टक्के, सन फार्मा 1552 टक्के, हिंदूजा ग्रूप 376 टक्के आणि एव्हेन्यू समूहाचे उत्पन्न 1166 टक्क्यांनी वाढले. सन फार्मा आणि एव्हेन्यू समूह या दोन्ही कंपन्या मुंबईच्या आहेत, याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईकरांना खोटंनाटं सांगून भरकटवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या खोट्या प्रचाराला यावेळी 'सविनय आणि सपुरावा' सुरुंग लावला. 

    कुणी तरी काल याच ठिकाणाहून वल्गना केल्या म्हणे, महायुती सत्तेत आली तर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करेल. त्यांना मी इतकेच सांगू इच्छितो कि, कोणाचा बाप आला तरी कोणीही मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही. इतकी वर्षे मुंबई महानगरपालिकेत त्यांची सत्ता असूनही त्यांनी फक्त खुर्च्याच तोडल्या, त्यांच्यामुळेच मराठी माणूस मागे पडला आहे, ही सत्यपरिस्थिती आहे. ही निवडणूक मुंबईकर, मराठी माणूस यांच्या अस्तित्वाची नसून मराठी माणसाच्या मुळावर उठलेल्या विरोधकांच्या अस्तित्वाची आहे.

    कालच्या सभेत काहींनी नक्कलही करून दाखवली, नक्कल करून काकांच्या पक्षाचे काय झाले इतकेच त्यांनी लक्षात ठेवावे. काकाकडे किमान नक्कल करण्याची आणि भाषण देण्याची तरी कला आहे, तुमच्याकडे तर तेही नाही.  

    महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यानंतर 5 वर्षांमध्ये नवी मुंबईमध्ये विमानतळ उभारले आणि आता तिसरे विमानतळ देखील तयार करणार आहोत. तसेच मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दीडपट विस्तार देखील करणार आहोत. विरोधकांना स्वतःच्या घराची जागा कमी पडली म्हणून त्यांनी स्वतःचे घर बदलले, मग मुंबईच्या आर्थिक विकासासाठी आम्ही नवीन विमानतळ उभारले, तर इतका विरोध का?  असा सवालही फडणवीसांनी केला.