जेएनएन, मुंबई. मुंबईतल्या शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची संयुक्त सभा सुरु आहे. या सभेत राज ठाकरेंनी भाजपावर हल्लाबोल केला. मी आणि उद्धव एकत्र का आलो? याचं कारणही ठाकरेंनी त्यांच्या भाषणात सांगितली.
राज ठाकरे यांनी व्यक्त केली दिलगिरी
राज ठाकरे 20 वर्षांनी मी पहिल्यांदा युती करतो आहे. त्यामुळे या युतीच्या सगळ्या प्रोसेसमध्ये अनेक लोकांना तिकिटं दिली गेली, अनेकांना नाही देता आली, काहींना वाटलं की दुसऱ्या पक्षात जावं. या गोष्टी होतात, आमच्याही हातात या गोष्टी नव्हत्या. पण जे नाराज असतील त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो.
मी आणि उद्धव एकत्र आलो कारण…
मी आणि उद्धव एकत्र आलो याचं कारण मुंबईवर आलेलं संकट. मी अनेक वर्षांपासून बोलत आलो, की कशा प्रकारे डाव रचला जातो आहे. हिंदी सक्तीचा विषय आणल्यानंतर मी पण कडाडलो. उद्धवही कडाडला. मी त्याआधीच म्हटलं होतं की कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. तिकडून या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली.
हिंदी सक्तीचा विषय फक्त तुम्हाला चाचपडून बघण्यासाठी होता. मराठी माणूस जागा आहे का? हे फक्त चाचपडणं होतं. 2024 नंतर म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर या सरकारला फेफरं आलं. जे काय हवं ते करायला लागले. इतकी हिंमत आली कुठून? कुणाला विचाराचंय नाही काही नाही, आम्हाला वाटलं की आम्ही केलं. पैसे फेकले की जनतेला विकत घेऊ हा आत्मविश्वास आला कुठून? असा सवाल राज ठाकरेंनी केला. काँग्रेसचीही सत्ता होती. पण जनतेला घाबरुन होते, पण आता घाबरणं वगैरे काहीच नाही असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
