Ramdas kadam Dasara Melava : विजयादशमी दसऱ्यानिमित्त राज्यात गुरुवारी दिवसभर अनेक राजकीय मेळावे पार पडले, मात्र मुंबईत पार पडलेल्या दोन्ही शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची राज्यभर चर्चा रंगली आहे. नेस्को सेंटरमध्ये पार पडलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी घणाघाती भाषण करत एक धक्कादायक गौप्यस्फोट केला. बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर दोन दिवस त्यांचा मृतदेह मातोश्रीवर ठेवला होता, तो कशासाठी ठेवला होता, असा सवाल करत याची एकनाथ शिंदेंनी चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली. त्याचबरोबर मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना आपल्याला ही गोपनीय माहिती कोणी दिली, त्या व्यक्तीचे नावही सांगितलं आहे.
रामदास कदमांनी आपल्या भाषणात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाविषयी धक्कादायक दावे केले. बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीत का ठेवण्यात आला होता, त्यांच्या हाताचे ठसे घेण्यासाठी हे करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.
रामदास कदम म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांचे निधन कधी झाले? आणि त्यांचा मृतदेह मातोश्रीवर किती दिवस ठेवण्यात आला होता, याचा तपास करावा अशी माझी एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं मृत्युपत्र कोणी केलं? हे मृत्युपत्र कधी झालं? त्यात सही कोणाची होती? असा सवाल करत त्यांनी या सर्व गोष्टींची माहिती काढावी, अशी खळबळजनक मागणीही रामदास कदम यांनी केली.
कदम म्हणाले की, मला माहिती आह मी खूप मोठं विधान करत आहे मात्र मी हे विधान जबाबदारीने करत आहे. शिवसेनाप्रमुखांवर उपचार करणारे डॉक्टर सध्या आहेत. त्यांच्याकडूनही माहिती घेऊ शकता. बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह उद्धव ठाकरे यांनी दोन दिवस मातोश्रीवर का ठेवला होता. त्यांचं अंतर्गत काय चाललं होतं? हे बाहेर आलं पाहिजे.
बाळासाहेब आजारी असताना त्या काळात मी आठ दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलो होतो. मला हे सगळं कळत होतं. पण हे सर्व कशासाठी करण्यात आलं. मला कोणीतरी सांगितलं की माँसाहेबांच्या हातांचे ठसेही घेण्यात आले होते. हे प्रकरण नेमकं काय आहे? त्यावेळी मातोश्रीमध्ये सगळी चर्चा याचीच सुरू होती.
कदमांना याची माहिती कोणी दिली?
नेस्को सेंटरवरील मेळावा संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना रामदास कदम यांनी सांगितलं की, मला ही माहिती बाळासाहेब ठाकरेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरही त्यांचा मृतदेह मातोश्रीवर ठेवला होता, आणि हे उद्धव ठाकरेंनी केलं असल्याचं त्या डॉक्टरांनी मला सांगितलं. याचं कारण काय हे उद्धव ठाकरेच सांगतील. मात्र तेव्हाही त्याबाबत मातोश्रीवर चर्चा सुरु होती की, बाळासाहेब ठाकरेंच्या हाताचे ठसे घेण्यात आले आहेत. मात्र ते कशासाठी घेण्यात आले ते काही समजलं नाही. मी हे सर्व सूड भावनेने बोलत नाही, सूड भावनेने तर उद्धव ठाकरे वागत आहेत. त्यांनी माझ्या मुलाला टार्गेट केले आहे. मात्र अजून भरपूर गोष्टी आहेत माझ्याकडे बोलण्यासाठी हळूहळू सर्व गोष्टी मी बाहेर काढणार आहे. ये तो झाँकी है अभी बहुत कुछ बाकी है.. असा इशाराही रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.