जेएनएन, मुंबई. Eknath Shinde Dasara Melava 2025 : एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मराठवा्ड्यातील पुरग्रस्तांचा उल्लेख केला. फेसबुक लाईव्ह करत वर्क फ्रॉम करणारा मी नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर टोला लगावला. व्हॅनिटी व्हॅन घेऊन दौरा करणारा मी नाही. जिथे संकट तिथे शिवसेना, मदतीचं धोरण हेच शिवसेनेचं धोरण, असं शिंदे यांनी सांगितलं. पूरग्रस्ताना दिलेल्या मदतीवर आमचे फोटो त्यांना दिसतात, फोटोग्राफरला दुसरे काय दिसणार, मात्र तुमचे फोटो घेऊन जेव्हा आम्ही मदत वाटत होतो तेव्हा तुम्हाला चालत होतं, असा टोलाही शिंदेंनी ठाकरेंना लगावला.  

दुष्काळग्रस्तांना आम्ही मदत केल्यानंतर त्या मदतीवरील आमचे फोटो विरोधकांना दिसतात मात्र काम दिसत नाही. फोटोग्राफरला फक्त फोटो दिसतात, असा टोला शिंदे यांनी लगावला. मदत करण्यासाठी दानत लागते. एकनाथ शिंदे यांचे दोन्ही हात देणारे आहेत. ही देना बँक आहे, लेना बँक नाही. आता म्हणता माझ्याकडे देण्यासाठी काही नाही, मात्र जेव्हा होते तेव्हा का दिले नाही. भविष्यातही तुमच्याकडून काही देणे व्हायचे नाही. आम्ही २६ प्रकारच्या जिनसा पूरग्रस्तांंना दिल्या, तुम्ही साधा बिस्किटाचा पुडातर द्यायचा, असं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. 

आम्ही शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत केली. तुम्ही मुंबई महापालिकेत जमवलेली माया कुठे गेली, असा सवाल शिंदे यांनी कुणाचंही नाव न घेता विचारला. हे व्यासपीठ हे समोर बसलेले शिवसैनिक ही माझी संपत्ती आहे. प्रॉपर्टीचा भुकेला मी नाही. मला काही लोकांनी विचारले तुम्ही कशाकशावर क्लेम करणार मात्र मी म्हटलं मला कशावरही दावा करायचा नाही. बाळासाहेबांचे विचार हीच माझी संपत्ती आहे. मगाशी रामदास कदम म्हणाले 30 वर्षे पालिका लुबाडली, कुठे गेली माया? लंडनला असे म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर भ्रष्टाचाराचा आरोप केला.

शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही - शिंदे

एकनाथ शिंदे म्हणाले, अतिवृष्टीने शेतकरी संकटात आहे. पशुधन वाहून गेले आहे. घरांची पडझड झाली आहे. मी स्वतः त्यांचे दु:ख पहिले आहे. आपण त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. दसऱ्याच्या दिवशी राज्यातील शेतकरी संकटात आहे. त्याचं सावट या सणावर आहे. पण, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, त्यांना सर्व मदत पोहचवणार, असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं. यावेळी शिंदे यांनी यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी केलेल्या मदतीचा व्हिडिओ देखील दाखवला.बळीराजा संकटात असल्याने राज्यभरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जिल्ह्यात थांबायला सांगितलं.