मुंबई. Uddhav Thackeray Dasara Melava Speech : दसऱ्यानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा पार पडला. दरवर्षीप्रमाणे यंदाही या मेळाव्याची जोरदार तयारी सुरू असतानाच गेल्या काही दिवसापासून मुंबईत मुसळधार पावसामुळे ठाकरेंचा मेळाव्यावर पावसाचे संकट आले होते. मात्र पावसाची पर्वा न करता हजारोंच्या संख्येने शिवसैनिक शिवाजी पार्कवर हजर झाले. या मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी तुफान टोलेबाजी करत एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांना गाढव म्हटले तर भाजप व मोदींवरही निशणा साधला.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आज ५८ वा दसरा मेळावा पार पडला. आगामी मुंबई महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच राज ठाकरेंसोबत होणारी संभाव्य युती लक्षात घेता या मेळाव्याला मोठे महत्व प्राप्त झाले होते. आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे तसेच शिवाजी पार्कवरील चिखलाचा उल्लेख करत याला कारण कमळाबाई, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला.
उद्धव ठाकरे म्हणाले, वाघाचं कातडं पांघरलेल्या लांडग्याची गोष्ट सर्वांना माहिती आहे. पण बाळासाहेबांची भगवी शाल पांघरणाऱ्या गाढवाचं चित्र मी आज पहिल्यांदा पाहिलं. गाढवावर कितीही शाली टाका. गाढव ते गाढवच असते, अमित शहांच्या जोड्याचा भार वाहणारे ते गाढव आहे. जनता यांना एक दिवस जोडे मारणार असून तो दिवस फास लांब नाही, अशी जहरी टीका उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर केली.
शिवाजी पार्कवर चिखल, याला कारण कमळाबाई -
उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका करताना म्हटले की, कमळ फुलवण्यासाठी सगळीकडे चिखल करून ठेवला आहे. अनेकांना कायद्यांचा दुरुपयोग करून तुरुंगात टाकले. सोनम वांगचूक एका परिषदेच्या निमित्ताने पाकिस्तानला गेले म्हणून त्यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात टाकले, मग गुपचूपपणे पाकिस्तानला जाऊन नवाज शरिफांच्या वाढदिवसाचा केक खाणारे मोदी कोण? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला आहे.
मुंबईमध्ये महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचा महापौर होणार अशी बोंबाबोंब करत आहेत. हिंदू मुस्लिम वाद करून मत मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला. मुंबई जर यांनी जिंकली तर आपली मुंबई अदानीच्या घशात घालतील, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.