जेएनएन, मुंबई: काँग्रेसचे पुण्यातील माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी कार्यकर्त्यांसह शिंदे यांच्या उपस्थितीत सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी हिंदुह्रयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा नकली आवाजातील व्हिडिओ करण्यापेक्षा त्यांचे विचार जपले असते तर कोणी कुठे गेले नसते, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर केली.
आता लोकांना कळेल धंगेकर कोण
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा धनुष्यबाण उचलला आणि भगवा हाती घेतला. रवींद्र धंगेकर हे पुण्यातले लोकप्रिय लोकनेता म्हणून त्यांची ओळख आहे. कामातून त्यांनी ओळख निर्माण केली. ते 25 वर्ष नगरसेवक होते. त्यापैकी शिवसेनेचे 10 वर्ष नगरसेवक होते. शिवसेनेत आल्याने आता लोकांना कळेल धंगेकर कोण, असे शिंदे म्हणाले. तुमचा जनसंपर्क पाहता लवकरच पुण्यातून हजारो कार्यकर्ते शिवसेनेत येतील, असा विश्वास यावेळी शिंदे यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत धंगेकर यांना 4 लाख 60 हजार मते मिळाली. यातून तुमचे काम आणि लोकप्रियता दिसून येते, अशा शब्दांत शिंदे यांनी धंगेकर यांचे कौतुक केले.
हेही वाचा - Chhatrapati Sambhaji Nagar Accident: उसाने भरलेला भरधाव ट्रक उलटला, उसाखाली दबल्यानं 4 मजूरांचा जागीच मृत्यू
खुर्चीसाठी 2019 मध्ये ज्यांनी…
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता पण मला लोकांनी हलक्यात घेतलं. त्यानंतर जे घडलं त्याची देशाने नाही तर जगातील 33 देशांनी दखल घेतली. एक सामान्य कार्यकर्ता काय करु शकतो हे जगाने पाहिले. शिवसेनेकडून 80 पैकी 60 आमदार निवडून आले आणि खरी शिवसेना कोणाची यावर जनतेने शिक्कामोर्तब केले. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार आपण पुढे घेऊन चाललोय, असे ते म्हणाले. कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्याला बळ देणारे आपण आहोत कपडे सांभाळणारे नाहीत, असे शिंदे म्हणाले. खुर्चीसाठी 2019 मध्ये ज्यांनी मोह केला त्यांना जनतेने विधानसभा निवडणुकीत धडा शिकवला. आपल्याला खुर्चीचा मोह नाही महाराष्ट्राला पुढे न्यायचे हा एकच ध्यास आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही तर सर्वसामान्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालाय असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
बाळासाहेबांच्या नकली आवाजातील व्हिडिओ दाखवण्यात आला
ते पुढे म्हणाले की, बाळासाहेबांच्या नकली आवाजातील व्हिडिओ दाखवण्यात आला. बाळासाहेबांचे जुन्या रेकॉर्ड्स जपून ठेवल्या आहेत असे ते सांगतात पण नकली लोक नकलीच कामे करणार असा टोला त्यांनी यावेळी उबाठावर लगावला. याऐवजी बाळासाहेबांचे विचार जपले असते तर फायदा झाला असता, कोणी कुठे गेले नसते, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
शिंदे यांच्या पावलावर पाऊल टाकायचे काम करु
धंगेकर म्हणाले की, शिवसेनेचा 10 वर्ष नगरसेवक होतो. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षात सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम महाराष्ट्राने पाहिले. कॉमन मॅन म्हणून शिंदे यांनी काम केले त्यांच्याच पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करु, अशी भावना धंगेकर यांनी व्यक्त केली.
काँग्रेसला पुण्यात खिंडार
धंगेकर यांच्यासमवेत सुरेश जैन, बाळासाहेब आंबरे, प्रणव धंगेकर, गोपाळ आगरकर, मिलिंद अहेर, अजित ढोकरे, रवींद्र खेडेकर, संजय पासोलकर, सतीश ढगे, राजू नाणेकर आदी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत यावेळी प्रवेश केला. यामुळे पुण्यात काँग्रेसला खिंडार पडले आहे.